अपहरण झालेल्या मुलाचा मृतदेह विहिरीत आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2017 00:40 IST2017-07-08T00:33:59+5:302017-07-08T00:40:40+5:30
लिंबेजळगाव : दिघी काळेगाव येथून अपहरण झालेल्या विशाल शांतीलाल गायकवाड या १७ वर्षीय मुलाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी एका विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे.

अपहरण झालेल्या मुलाचा मृतदेह विहिरीत आढळला
लोकमत न्यूज नेटवर्क
लिंबेजळगाव : दिघी काळेगाव येथून अपहरण झालेल्या विशाल शांतीलाल गायकवाड या १७ वर्षीय मुलाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी एका विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, मयत मुलाच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने घटनास्थळी गदारोळ झाला.
विशाल रविवारी गावाजवळच खळ्यात बैलांना चारा टाकण्यासाठी गेला होता. रात्र झाली तरी विशाल घरी का आला नाही म्हणून आई, वडील व नातेवाईकांनी विशालचा शोध घेतला. परंतु विशाल सापडला नसल्याने सोमवारी वाळूज पोलीस ठाण्यात शांतीलाल गायकवाड यांनी अपहरणाची तक्रार दिली होती. त्यावरुन वाळूज पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत विशालचा शोध सुरु केला. घटनेच्या सहाव्या दिवशी शुक्रवारी सकाळी विशालचा मृतदेह विहिरीत आढळून आला.
संशयावरुन पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशी करुन त्यांना सोडून देण्यात आले होते.
दिघी -कनकोरी रस्त्यावरील कनकोरी शिवारातील गट नं.९८ मधील नवनाथ रघुनाथ पेहरकर (रा.येसगाव ) या शेतकऱ्याच्या विहिरीत विशालचा मृतदेह आढळून आल्याने परिसरातील नागरिकांनी विहिरीभोवती मोठी गर्दी केली.
गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मयताच्या नातेवाईकांनी पोलिसांना चांगलेच धारेवर धरले. ४ संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर वाळूज पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने
मृतदेह विहिरीबाहेर काढला व शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात दाखल केला. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच खरा प्रकार समोर येणार आहे .
औरंगाबाद महानगरपालिकेच्या जवानांनी मृतदेह विहिरीबाहेर काढला. घटनास्थळी सहायक पोलीस आयुक्त नागनाथ कोडे, वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख, उपनिरीक्षक अमीत बागूल, गजानन सोनटक्के, सहायक फौजदार दत्तात्रय साठे, पो.हॅ.कॉ. मच्छींद्र शेळके, गणेश पाटील, शेख व शिल्लेगावचे सहायक पोलीस निरीक्षक मिलींद खोपडे, उपनिरीक्षक पी.ए.मुंडे, पो.हॅ.कॉ. विनोद डिघोत आदींनी भेट दिली. सध्या तरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेऊन तपास सुरु केला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावरच घटनेचा उलगडा होणार आहे.