पुन्हा आढळले मानवी मृतदेहाचे अवयव

By Admin | Updated: May 26, 2015 00:47 IST2015-05-26T00:20:16+5:302015-05-26T00:47:39+5:30

नळदुर्ग : उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे मानवी कवटी आढळल्याची घटना नुकतीच घडली आहे. याप्रकरणी दोघांवर कारवाईही झाली आहे

Body of the human body found again | पुन्हा आढळले मानवी मृतदेहाचे अवयव

पुन्हा आढळले मानवी मृतदेहाचे अवयव


नळदुर्ग : उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे मानवी कवटी आढळल्याची घटना नुकतीच घडली आहे. याप्रकरणी दोघांवर कारवाईही झाली आहे. दरम्यान, तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव साठवण तलाव क्षेत्रातील शिरगापूर पुलानजीक सोमवारी एका पुरूषाच्या मृतदेहाचे अवयव आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर मयत इसमाचे वय अंदाजे पस्तीस ते चाळीस वर्षे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बाभळगाव साठवण तलाव क्षेत्रातील या पुलाजवळ अज्ञात इसमाचे प्रेत असल्याची शंका काही नागरिकांनी पोलिसांकडे व्यक्त केली होती. यावरून ईटकळ दूरक्षेत्रमधील हेकॉ एस. जी. शिंदे यांनी तातडीने या ठिकाणी जावून शोधाशोध सुरू केली. यावेळी पुलापासून काही अंतरावर बेशरमाच्या झाडात सडलेल्या अवस्थेत मृतदेहाचे काही अवयव आढळून आले. सदर मृतदेह पाण्यात भिजल्यामुळे पूर्णपणे सडून गेला होता. तसेच श्वापदांनी त्याचे लचके तोडल्याने अनेक अवयव विखुरले गेले होते. यावेळी शर्टाच्या बाहीत पायाच्या हाडाचे सांगाडे असल्याचे दिसले. तसेच नायलॉनच्या दोरीने या इसमाचे दोन्ही पाय बांधून टाकल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले.
याबाबत नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सपोनि फुलचंद मेंगडे यांना माहिती मिळताच तेही सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सदर मृताच्या अंगात असलेल्या शर्टवर टेलरचा ट्रेडमार्क तसेच या ठिकाणी एका खाजगी वित्त संस्थेचे आरडी खात्याचे पासबूकही आढळून आले आहे. या पासबूकवरील नोंदी तेलगू भाषेत आहेत. सदर इसमाचा खून करून जवळपास महिन्याभरापूर्वी पाण्यात टाकले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे.
याप्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून, जवळच्या पोलिस ठाण्यासह आंध्र, कर्नाटकातील ठाण्यांनाही याबाबत माहिती कळविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी पोउपनि जी. एच. पठाण, हेकॉ शिंदे, पोकॉ वाघमोडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
शिरगापूर पुलानजीक आढळून आलेल्या या प्रेताची सध्या कसलीच ओळख पटत नसली तरी शर्टवरील टेलरचा पत्ता, आरडी पासबूक यावरून याचा लवकरच छडा लागेल, असे सपोनि मेंगडे यांनी सांगितले. तसेच घटनास्थळी मिळालेली हाडे न्याय वैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून, वेळ पडल्यास डीएनए चाचणी देखील करू, असेही मेंगडे यांनी सांगितले.

Web Title: Body of the human body found again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.