मृतदेह आणला पोलिस ठाण्यात
By Admin | Updated: May 11, 2015 00:30 IST2015-05-11T00:15:43+5:302015-05-11T00:30:25+5:30
जालना : शहरातील सदर बाजार पोलिस ठाण्यात शेख चाँद (वय ७०, रा. लोधी मोहल्ला) यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांनी रविवारी सायंकाळी आणल्याने खळबळ उडाली.

मृतदेह आणला पोलिस ठाण्यात
जालना : शहरातील सदर बाजार पोलिस ठाण्यात शेख चाँद (वय ७०, रा. लोधी मोहल्ला) यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांनी रविवारी सायंकाळी आणल्याने खळबळ उडाली. त्यामुळे दीड तास ठाणे परिसरात तणावाचे वातावरण होते. मात्र नंतर पोलिसांनी शवविच्छेदन करून त्याद्वारे प्राप्त वैद्यकीय अहवालानुसार कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने नातेवाईकांनी मृतदेह तेथून हलविला.
लोधी मोहल्ला भागात ३ मे रोजी झालेल्या हाणामारी प्रकरणातील एका आरोपीचे वडील शेख चाँद यांचा मृत्यू सदरील घटनेच्या धक्क्याने झाला, त्यामुळे दुसऱ्या गटातील आरोपींवर गुन्हे दाखल करा, या मागणीसाठी नातेवाईकांनी शेख चाँद यांचा मृतदेह सदर बाजार पोलिस ठाण्यात आणला. या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. नातेवाईकांचा जमाव थेट ठाण्याच्या आवारात शिरला. त्यावेळी ठाण्यात मोजकेच पोलिस अधिकारी, कर्मचारी हजर होते. या प्रकाराची माहिती कळताच अतिरिक्त पोलिसांची कुमक त्या ठिकाणी दाखल झाली. मृताच्या नातेवाईकांचे म्हणणे पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी ऐकले. सदरील हाणामारी प्रकरणात यापूर्वीच गुन्हा दाखल झालेला आहे. शेख चाँद यांच्यावर शवविच्छेदन करून त्याद्वारे प्राप्त वैद्यकीय अहवालानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे बल्लाळ यांनी सांगितले. (वार्ताहर)