बोथीच्या तरुणांनी केले दारूचे अड्डे नष्ट
By Admin | Updated: July 23, 2014 00:32 IST2014-07-23T00:00:15+5:302014-07-23T00:32:27+5:30
चाकूर : जे गाव करील ते राव करू शकत नाही, अशी म्हण आहे़ त्यातच आजच्या युवकांनी उद्याच्या भारताचे स्वप्न पाहिल्यास काय घडू शकते

बोथीच्या तरुणांनी केले दारूचे अड्डे नष्ट
चाकूर : जे गाव करील ते राव करू शकत नाही, अशी म्हण आहे़ त्यातच आजच्या युवकांनी उद्याच्या भारताचे स्वप्न पाहिल्यास काय घडू शकते, याचा छोटासा किस्सा चाकूर तालुक्यातील बोेथी तांड्यावर तरुणांच्या पुढाकारातून मार्गी लागलेला पहावयास मिळाला़
परंपरेनुसार आणि पिढ्यान्पिढ्या गावठी दारू बनविण्याचा व्यवसाय या तांड्यावर चालतो़ त्याला कायमस्वरूपी बंद करण्यासाठी पोलिसांतही तशी धमक उरली नाही़ ऐरवी दमदाटी व दंडुक्याच्या जोरावर काम करत असलेल्या पोलिस यंत्रणेला अवैध दारूचे अड्डे कायमचे बंद व्हावे असे वाटत नाही़ मात्र वाढत्या दारू व्यवसायाने तांडा व परिसरात काही महिन्यांपासून एक वेगळेच चित्र पहायला मिळत आहे़ या अड्ड्यावर दारू पिऊन नेहमीच भांडणे होऊ लागले आहेत़ परिणामी पिढ्यान्पिढ्या या व्यवसायात रूजलेली तरूण पिढी नष्ट होत आहे़ त्यामुळे या दारूड्यांचा त्रास महिला व इतर नागरिकांना होत आहे़ ही बाब लक्षात घेऊन संतोष जाधव, महेश राठोड, लिंबराज जाधव यांच्यासह १५ ते २० तरूण पुढे आले़ त्यांनी पुढाकार घेऊन अवैध व्यवसायाबद्दल गावामध्ये जागृती करून गावातील अवैध धंद्याबाबत पोलिसांना माहिती दिली़
पोलिस प्रशासनानेही तरुणांच्या विचारांचे स्वागत केले़ उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली शिंदे, पोलिस निरीक्षक गजानन सैदाने, सपोनि़ एस़ए़ लहाने, पोहेकॉ़ एफ़ओ़शेख, शिवाजी हंगरगे यांनी आपल्या पोलिसांच्या फौजफाट्यासह त्या गावातील हातभट्टीच्या अड्ड्यावर छापा मारला़ उसाच्या शेतात दडवून ठेवलेले गुळमिश्रीत रसायन जप्त केले़ तसेच २ हजार ४४० रूपयांचा ऐवज जप्त केला़ याप्रकरणी अनिल पवार, मोतीराम चव्हाण, शिवाजी जाधव, परशुराम चव्हाण यांच्यावर मुंबई प्रदूषण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला़ तरुणांनी घेतलेल्या या पुढकारातून व पोलिस प्रशासनाच्या सहकार्यातून केलेल्या अवैध दारू विक्री कारवाईमुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे़ (वार्ताहर)