लातूर बाजार समितीचे संचालक मंडळ अखेर बरखास्त
By Admin | Updated: November 13, 2014 00:52 IST2014-11-13T00:46:24+5:302014-11-13T00:52:27+5:30
लातूर : मुदत संपूनही निवडणुका न होणाऱ्या जिल्हाभरातील आठ बाजार समित्यांचे संचालक मंडळ बरखास्त होत आहेत. त्यातील लातूर बाजार समितीचे संचालक मंडळ बुधवारी बरखास्त

लातूर बाजार समितीचे संचालक मंडळ अखेर बरखास्त
लातूर : मुदत संपूनही निवडणुका न होणाऱ्या जिल्हाभरातील आठ बाजार समित्यांचे संचालक मंडळ बरखास्त होत आहेत. त्यातील लातूर बाजार समितीचे संचालक मंडळ बुधवारी बरखास्त करुन जिल्हा उपनिबंधक ए. एल. घोलकर यांनी स्वत: प्रशासक म्हणून पदभार घेतला. आता येत्या दोन दिवसात जिल्ह्यातील आणखी सात बाजार समित्यांचे संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासक नेमण्याच्या हालचाली चालू आहेत. लातूर बाजार समितीची मुदत संपून दोन वर्षे उलटली आहेत. परंतु संचालक मंडळाने दोन वेळा सहा-सहा महिन्यांची तर निवडणुका आणि इतर कारणांमुळे सहा-सहा महिन्यांच्या दोन वेळा मुदतवाढी मिळाल्या. आता मुदत संपूनही निवडणुका न झाल्याने जिल्हा उपनिबंधक ए. एल. घोलकर यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास विनियमन) अधिनियम १९६३ (१५ अ) (१) (अ) नुसार संचालक मंडळ बरखास्त करुन सायंकाळी पाच वाजता पदभार स्विकारला. यावेळी सभापती विश्वंभर मुळे, उपसभापती गायकवाड, सचिव मधुकर गुंजकर उपस्थित होते़ (प्रतिनिधी) ४
जिल्ह्यातील दोन बाजार समित्यांवर यापूर्वीच प्रशासक नेमण्यात आले आहेत. यात औराद शहाजानी आणि चाकूर बाजार समित्यांचा समावेश आहे.
जळकोट, रेणापूर, देवणी, निलंगा आणि शिरुर अनंतपाळ या बाजार समित्यांचे प्रशासकीय संचालक मंडळ गुरुवारी बरखास्त करुन प्रशासक नेमण्यात येणार आहेत.
येत्या सहा महिन्यात जिल्ह्यातील आठही बाजार समित्यांच्या निवडणुकीची धुळवड रंगणार आहे. विधानसभा निवडणुकीत चमत्कार करणाऱ्या भाजपाचे पदाधिकारी आता बाजार समित्यांच्या राजकारणात कसा शिरकाव करतात आणि रिकामे झालेले काँग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी आपले वर्चस्व कसे सिध्द करतात याकडे डोळे आहेत.