तलवारीने वार करून तरुणाचा निर्घृण खून
By Admin | Updated: November 14, 2016 00:31 IST2016-11-14T00:33:16+5:302016-11-14T00:31:16+5:30
बीड : शहरातील सय्यदअली नगर भागात जुन्या भांडणातून शेख अजमोद्दीन शेख रहिमोद्दीन (वय २५) याची तलवारीने सपासप वार करून हत्या केल्याची घटना रविवारी रात्री दहा वाजता घडली.

तलवारीने वार करून तरुणाचा निर्घृण खून
बीड : शहरातील सय्यदअली नगर भागात जुन्या भांडणातून शेख अजमोद्दीन शेख रहिमोद्दीन (वय २५) याची तलवारीने सपासप वार करून हत्या केल्याची घटना रविवारी रात्री दहा वाजता घडली. या हल्ल्यात अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.
घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, सय्यदअली नगर भागात मयत शेख अजमोद्दीन हा आपल्या घरासमोर उभा होता. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोन ते तीन तरूणांनी त्याच्यावर तलवारीने वार केले. त्याच्या पोटात खोलवर जखम झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी आलेल्या गुलाब शहाबुद्दीन व रियाज शहाबुद्दीन यांच्यावरही तलवारीने हल्ला करण्यात आला. यात हे दोघेही जखमी झाले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले.
दरम्यान, शेख अजमोद्दीन याला परिसरातील तरूणांनी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांनी त्याची तपासणी करून त्याला मयत घोषित केले. या घटनेनंतर अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक गणेश गावडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सय्यदअली नगर भागात मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती. काही वेळ तणावाचे वातावरण होते. मात्र, पोलिसांनी ही गर्दी पांगवली. त्यानंतर तपासाची चक्रे गतिमान करीत शेख मुस्तफा याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
शेख अजमोद्दीन याचे काही दिवसापूर्वी भांडण झाले होते. हा वाद गल्लीतील तरूणांनी आपापसात मिटवला होता. मात्र, रविवारी अजमोद्दीन याच्यावर अचानक हल्ला झाला. जुन्या भांडणातूनच ही हत्या झाल्याचा संशय आहे. गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. (प्रतिनिधी)