सुरतगाव शिवारात तरूणाचा खून
By Admin | Updated: August 15, 2014 01:36 IST2014-08-15T01:29:12+5:302014-08-15T01:36:48+5:30
तामलवाडी : अठ्ठााविस वर्षीय तरूणाच्या गळ्यावर चाकूने वार करून व डोक्यावर पाठीमागील बाजूने दगडाने ठेचून निर्घृण खून करून प्रेत रक्ताच्या थारोळ्यात टाकून

सुरतगाव शिवारात तरूणाचा खून
तामलवाडी : अठ्ठााविस वर्षीय तरूणाच्या गळ्यावर चाकूने वार करून व डोक्यावर पाठीमागील बाजूने दगडाने ठेचून निर्घृण खून करून प्रेत रक्ताच्या थारोळ्यात टाकून दिल्याची घटना तुळजापूर- सोलापूर रस्त्यावर सुरतगाव शिवारात बुधवारी सकाळी उघडकीस आली.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, बुधवारी सकाळी गंजेवाडी येथील बालाजी अमाईन्सचे कामगार सायकलवरुन कारखान्याकडे कामाला जात असताना त्यांना सोलापूर- तुळजापूर रस्त्यावर सुरतगाव शिवारात केरबा कटारे यांच्या शेतालगत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तरुणाचे प्रेत दिसले. याबाबत त्यांनी तातडीने तामलवाडी पोलिसांना माहिती दिली. यानंतर सपोनि राहुल देशपांडे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे, बीट अंमलदार ए. एस. शिंदे, अरुण ओव्हाळ, ए. एम. शेवाळे, राहुल खटके, एम. एम. अरब यांनी घटनास्थळी भेट देवून तरुणाच्या प्रेताची पाहणी केली. यावेळी अंगात निळी जीन्स पँट, रेघाळा टी शर्ट, दाढी वाढलेली अशा अवस्थेत हे प्रेत तेथे पडले होते. पोलिसांनी प्रेताची पाहणी केली असता त्याच्या गळ्याजवळ तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे तसेच डोक्याच्या पाठीमागे दगडाने ठेचून रक्तबंबाळ केल्याचेही पोलिसांना दिसून आले.
मयताच्या उजव्या हाताच्या कोपराजवळ आरती, एम. महानंदा अशी गोंदलेली नावे आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. मयताजवळ याशिवाय इतर कोणताही पुरावा मिळाला नाही. मयताच्या ठिकाणापासून मोटारीच्या चाकाचे व्रण दिसून आले. बुधवारी दुपारी प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी कलासागर यांनी घटनास्थळास भेट दिली. याप्रकरणी प्रारंभी अभियंता मोहन काळे (रा. तामलवाडी) यांनी दिलेल्या माहितीवरुन तामलवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान, अनोळखी मयत तरुणाचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले असून, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणी अहवालानंतर तरुणाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. अधिक तपास सपोनि राहुल देशपांडे हे करीत आहेत. (वार्ताहर)