रक्तही अडकले महागाईच्या विळख्यात
By Admin | Updated: July 19, 2014 00:45 IST2014-07-19T00:27:48+5:302014-07-19T00:45:53+5:30
शिवराज बिचेवार, नांदेड जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईने हैराण झालेल्या जनतेला आता आयुष्याची दोरी बळकट करणारे दानातील रक्तही दुप्पट किमतीने खरेदी करावे लागणार आहे़
रक्तही अडकले महागाईच्या विळख्यात
शिवराज बिचेवार, नांदेड
जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईने हैराण झालेल्या जनतेला आता आयुष्याची दोरी बळकट करणारे दानातील रक्तही दुप्पट किमतीने खरेदी करावे लागणार आहे़ पूर्वी शासकीय रक्तपेढ्यांमध्ये ४५० रुपये प्रतियुनिट मिळणाऱ्या रक्तासाठी आता १०५० तर खाजगीमध्ये ८५० रुपयांऐवजी तब्बल १४५० रुपये मोजावे लागणार आहेत़ त्यामुळे श्रेष्ठ दान असलेल्या रक्तालाही महागाई आली आहे़
राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत गठीत केलेल्या १६ सदस्यीय समितीच्या सदस्यांनी केलेल्या शिफारशी रक्त संक्रमण परिषदेने मान्य केल्या आहेत़ त्यानंतर सार्वजनिक आरोग्य सेवा विभागाने अध्यादेश काढून रक्ताच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे़ मृत्यूच्या दाढेत असलेल्या अनेकांना रक्ताची गरज भासते़ अशा रुग्णांना वेळेवर रक्त मिळाल्यास त्यांचे प्राण वाचू शकतात़ रक्ताची ही गरज रक्तदानातून भागविली जाते़ त्यासाठी अनेक नागरिक, संस्था, पक्ष रक्तदान शिबिरे आयोजित करतात़, परंतु आता अशा दानातून मिळालेल्या अमूल्य रक्ताचेही मोल शासनाने वाढविले आहेत़ पूर्वी सामाजिक भान ठेवून रक्तपेढ्या उघडल्या जायच्या़ परंतु आता त्याकडे केवळ व्यवसाय म्हणून पाहिले जात आहे़
शासकीय रक्तपेढ्यांमध्ये ४५० तर खाजगीत ८५० रुपयांत रक्त मिळायचे़ आता तेवढी रक्कम फक्त रक्त तपासणीच्या नावाखाली उकळले जाते़ त्यातही रक्तातील वेगवेगळ्या घटकाचे वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले आहेत़ त्यात काही रक्तपेढ्यांकडून तर चक्क रक्ताच्या एक युनिटसाठी तब्बल ३ हजार रुपये उकळले जातात़ विशेष म्हणजे त्यासाठी रक्ताच्या वेगवेगळ्या तपासणीची नावे पुढे केली जातात़ जिल्ह्याची लोकसंख्या ३५ लाखांवर पोहोचली आहे़ अपघातग्रस्त, सिकलसेल, थॅलेसेमिया यासारख्या रुग्णांना दररोज रक्त लागते़
मोठ्या प्रमाणात रक्त संकलन सुरु असतानाही, रक्ताचा तुटवडा वारंवार जाणवतो़ नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेवून खाजगी ब्लड बँकाकडून त्यांची लुबाडणुक केली जाते़ त्यात आता जीवनदायी रक्ताच्या या वाढीव दराचा गोरगरीब रुग्णांना मोठा फटका बसणार हे निश्चित़
२० हजार युनिट रक्ताची गरज
जिल्ह्याला दरवर्षी २० हजार ब्लड बॅगची आवश्यकता असते़ परंतु काही खाजगी ब्लड बँकांनी रक्ताचा अक्षरक्ष: बाजार मांडलाय़शासनाचे दर काहीही असले तरी, त्यांच्याकडून मात्र अव्वाच्या सव्वा दराची आकारणी करुन रुग्णांची अडवणूक केली जाते़ सेवाभाव म्हणून सुरु केलेल्या ब्लड बँकांनी सेवा सोडून मेवा खाण्याचे काम सुरु केले आहे़
या रुग्णांना मोफत रक्त
राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार सर्व रक्तपेढ्यांना थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकलसेल अॅनेमिया, इतर रक्ताशी निगडित आजार (ज्या आजारात रुग्णास जीवित राहण्यासाठी वारंवार रक्त संक्रमण करावे लागते, अशा आजाराचे बाधित रुग्ण) या सर्वांना मोफत रक्त देणे बंधनकारक आहे़
शहरातील रक्ता अन्य शहरालाही होतो पुरवठा
शहरात अनेक ठिकाणी रक्तदान शिबीरांचे आयोजन केले जाते़ यात शासकीय रुग्णालये, विविध संस्था, पक्ष संघटनाचा यांचा सहभाग असतो़ या शिबीरातून संकलित झालेले रक्त इतर शहरांमध्येही पाठविण्यात येते़