वर्षभरात १४ हजार ४६४ दात्यांचे घाटीसाठी रक्तदान
By Admin | Updated: October 1, 2014 00:44 IST2014-10-01T00:44:39+5:302014-10-01T00:44:39+5:30
औरंगाबाद : एखाद्या घटनेत अतिरक्तस्राव झालेल्या रुग्णास तातडीने रक्त दिले तरच त्याचे प्राण वाचतात. घाटीसारख्या मोठ्या रुग्णालयात रोज दाखल होणाऱ्या रुग्णांना सरासरी ७० ते ८० रक्ताच्या बॅगची गरज भासते.

वर्षभरात १४ हजार ४६४ दात्यांचे घाटीसाठी रक्तदान
औरंगाबाद : एखाद्या घटनेत अतिरक्तस्राव झालेल्या रुग्णास तातडीने रक्त दिले तरच त्याचे प्राण वाचतात. घाटीसारख्या मोठ्या रुग्णालयात रोज दाखल होणाऱ्या रुग्णांना सरासरी ७० ते ८० रक्ताच्या बॅगची गरज भासते. रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये, यासाठी घाटीतील शासकीय रक्तपेढीकडून सतत प्रयत्न केले जातात. वर्षभरात २०० शिबिरांच्या माध्यमातून १४ हजार ४६४ जणांनी घाटीसाठी रक्तदान केले. या दात्यांनी केलेल्या रक्तदानामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले.
घाटीत वेगवेगळ्या ३० हून अधिक वॉर्डांत बाराशेहून अधिक रुग्ण दाखल असतात. तेथील विविध आॅपरेशन थिएटरमध्ये रोज सरासरी ४० हून अधिक मोठ्या आणि ६० ते ७० लहान शस्त्रक्रिया होतात. १० ते १२ सिझेरियन प्रसूती होतात. यातील अनेक रुग्ण असे असतात की, त्यांना रक्त द्यावेच लागते. रुग्णास वेळेत रक्तपुरवठा केला नाही तर त्याची प्रकृती धोक्यात येते. अशा परिस्थितीत तातडीने रक्ताची बॅग घेऊन येण्याचा सल्ला डॉक्टर नातेवाईकांना देतात. रक्ताची मागणी करणारे विनंतीपत्र शासकीय रक्तपेढीत नेल्यानंतर कोणताही विचार न करता रुग्णास वॉर्डातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमार्फत रक्ताची बॅग पुरविण्यात येते. रक्ताचा स्टॉक कायम ठेवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तदान करण्याचा सल्लाही दिला जातो. काही वेळा तर रुग्णांचे नातेवाईकही सोबत नसतात. अशा वेळी त्यास लागतील तेवढ्या रक्तबॅगचा पुरवठा करून त्याचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्टर आणि रक्तपेढीतील मंडळी शर्थीचे प्रयत्न करतात. बऱ्याचदा विशिष्ट रक्तगटाचा तुटवडाही निर्माण होतो.
ही परिस्थिती एप्रिल ते जून या कालावधीत दरवर्षी जाणवते. त्यामुळे रक्तदान करण्याचे आवाहन रक्तपेढीच्या वतीने करण्यात येते. त्या आवाहनास शहरवासीयांकडून प्रतिसादही देण्यात येतो.