रक्तपेढ्या ऑक्सिजन, दोन दिवस पुरेल एवढाच साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:02 IST2021-04-04T04:02:07+5:302021-04-04T04:02:07+5:30
औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील रक्तपेढ्या सध्या ऑक्सिजनवर आहे. रक्तपेढ्यात एक ते दाेन दिवस पुरेल एवढाच साठा आहे. परिणामी, गरजू ...

रक्तपेढ्या ऑक्सिजन, दोन दिवस पुरेल एवढाच साठा
औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील रक्तपेढ्या सध्या ऑक्सिजनवर आहे. रक्तपेढ्यात एक ते दाेन दिवस पुरेल एवढाच साठा आहे. परिणामी, गरजू रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. दरवर्षी उन्हाळ्यात रक्तदानाचे प्रमाण घटते. यावर्षी कोरोना आणि लसीकरणामुळे रक्तदानावर मोठा परिणाम झाला आहे. रुग्णांना नवे आयुष्य देण्यासाठी नागरिकांनी पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन रक्तपेढ्यांनी केले आहे.
थॅलेसेमिया, हिमोफिलिया यासह विविध आजार असलेल्या रुग्णांसह अपघातात जखमी, विविध शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना रक्ताची आवश्यकता असते. वेळेवर रक्तपुरवठा न झाल्यास रुग्ण दगावू शकतात. मात्र सध्या औरंगाबादेतील रक्तपेढ्यांत रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला. दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताची तीव्र टंचाई भासते. कारण उन्हाळ्यात रक्तदानासाठी फारसे कोणी पुढे येत नाही. आता उन्हाळ्यासह कोरोनाचे संकट असल्याने रक्तसंकलन घटले आहे. परिणामी, रुग्णांना रक्त मिळत नसल्याची परिस्थिती आहे. रक्तासाठी दात्यांची शोधाशोध करावी लागत आहे. रक्तदान शिबिर झाली तरच टंचाई कमी होऊ शकते.
------
दत्ताजी भाले रक्तपेढी
सर्व रक्त गट मिळून ११० पिशव्या शिल्लक आहेत. हा साठा २ दिवस पुरेल एवढा आहे. कोरोनापूर्वी रोज एक किंवा कधी कधी दोन तीन शिबिरे होत असत. महिन्यात ३० ते ३५ शिबिरांतून १२०० ते १५०० रक्तपिशव्यांचे संकलन होत असे. रक्तपेढीत दिवसात १० ते १५ दाते येत असत. त्यातून महिन्यात रक्तपेढीत ३०० ते ४०० रक्तपिशव्यांचे संकलन होत असे. आता आता ८ दिवसात एखादे शिबिर होत आहे. त्यातून पुरेसे संकलन होत नाही. दात्यांना फोन करून बोलवावे लागते, असे दत्ताजी भाले रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी आप्पासाहेब सोमासे म्हणाले.
------
औरंगाबाद ब्लड बँक
कोरोनापूर्वी महिन्याला सरासरी ७५० रक्तपिशव्यांचे संकलन होत असे. परंतु आता ही संख्या खूप कमी झाली आहे. फेब्रुवारीत ३५० पिशव्यांचे संकलन झाले. मार्च महिन्यात आणखी घट झाली. संपूर्ण मार्च महिन्यात केवळ १७५ रक्तपिशव्यांचे संकलन झाले. शहरातील सर्व रक्तपेढ्यांच्या माध्यमातून जनतेला आवाहन की आपल्या संस्थेमध्ये, कॉलनीमध्ये तसेच गावामध्ये छोटीमोठी रक्तदान शिबिरे आयोजित करावे, असे औरंगाबाद ब्लड बँकेचे जनसंपर्क अधिकारी श्यामराव सोनवणे म्हणाले.
------
लोकमान्य रक्तपेढी
कोरोना प्रादुर्भावाच्या पूर्वी महिन्याला ७०० ते ८०० रक्तपिशव्यांचे संकलन होत असे. परंतु हे प्रमाण आता २०० ते २५० च्या घरात आले आहे. हा रक्तसाठा म्हणजे एक दिवस पुरेल एवढाच आहे. रक्ताचा तुटवडा भासू नये, यासाठी धार्मिक, राजकीय, सामाजिक संस्था व गृहनिर्माण सोसायट्यांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. रक्तदात्यांनी नजीकच्या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करावे, असे आवाहन लोकमान्य रक्तपेढीचे संचालक रोशन सोनवणे यांनी केले आहे.
----
विभागीय रक्तपेढीत २ दिवसांचाच साठा
घाटीतील विभागीय रक्तपेढीत मागच्या वर्षी, मार्च २०२० मध्ये १ हजार ३१५ रक्तपिशव्या होत्या. यावर्षी मार्चमध्ये केवळ २४२ रक्तपिशव्यांचे संकलन झाले. या संपूर्ण महिन्यात केवळ ५ रक्तदान शिबिरे झाली. सध्या रक्तपेढीत दोन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे, अशी माहिती विभागीय रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी हनुमान रुळे यांनी दिली.
--------
लसीकरणाआधी करा रक्तदान
सध्या कारोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ही लस घेतल्यानंतर २८ दिवस आणि दुसरा डोस घेतल्यानंतर पुन्हा २८ दिवस असे २ महिने दात्याला रक्तदान करता येत नाही. त्यामुळे रक्तसंकलनावर परिणाम होत आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याआधी रक्तदान करावे, असे आवाहन रक्तपेढ्यांनी केले आहे.