दुभाजकातील ब्लॉकेज प्रवाशांच्या जीवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:21 IST2021-02-05T04:21:55+5:302021-02-05T04:21:55+5:30
औरंगाबाद : एका हातात बॅग, सुटकेस आणि दुसऱ्या हाताने लहान मुलांना धरलेले आणि भरधाव वाहने जाणाऱ्या रस्त्यावरील दुभाजकातील छोट्याशा ...

दुभाजकातील ब्लॉकेज प्रवाशांच्या जीवावर
औरंगाबाद : एका हातात बॅग, सुटकेस आणि दुसऱ्या हाताने लहान मुलांना धरलेले आणि भरधाव वाहने जाणाऱ्या रस्त्यावरील दुभाजकातील छोट्याशा मोकळ्या जागेतून रस्ता ओलांडण्याची कसरत. हे चित्र आहे मध्यवर्ती बसस्थानकासमोरील. स्थानकात ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांना दुभाजकातून धोकादायक पद्धतीने मार्ग काढावा लागत आहे. यातून पावलोपावली अपघाताचा धोका निर्माण होत आहे; मात्र याकडे महापालिका आणि एसटी महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे.
मध्यवर्ती बसस्थानकातून दररोज हजारो प्रवाशांची ये-जा होते. बसस्थानकात जाण्यासाठी आणि बसस्थानकातून बाहेर पडल्यानंतर जीव मुठीत घेऊन दुभाजक ओलांडण्याची वेळ सध्या प्रवाशांवर ओढावत आहे. या रस्त्यावरील दुभाजकाची काही वर्षांपूर्वीच उंची वाढविण्यात आली; मात्र बसस्थानकासमोर पुरेशी मोकळी जागा सोडण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. रस्त्याच्या ऐन वळणावर दोन ठिकाणी दुभाजकात एक व्यक्ती ये-जा करू शकेल, अशी मोकळी जागा सोडण्यात आली. या मोकळ्या जागेतून ये-जा करण्यासाठी प्रवाशांच्या रांगा लागतात. रस्ता ओलांडताना अचानक समोर प्रवासी आल्याने ब्रेक लावण्याची वेळ वाहनचालकांवर ओढावत आहे. त्यातून अपघाताचा धोका वाढत आहे.
दादरा गैरसोयीचा, वापरच नाही
मध्यवर्ती बसस्थानक आणि सिद्धार्थ उद्यान यांच्या मधाेमध दादरा उभारण्यात आला; परंतु दादऱ्याला विक्रेत्यांचा विळखा पडला आहे. शिवाय दादरा लांब पडतो. प्रवाशांचा विचार करून हा दादरा उभारण्यात आला नसल्याने त्याचा वापरच होत नसल्याची स्थिती आहे.
प्रवासी, औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानक
दुभाजकात मोठी जागा हवी
रस्ता ओलांडण्यासाठी दुभाजकात बराच वेळ उभे राहावे लागते. खूप कमी जागा आहे. वाहने वेगाने धावतात. दुभाजकात मोठी जागा पाहिजे. दादरा आहे, हे लक्षात येतच नाही. शिवाय तो खूप दूर आहे, असे कन्नडहून आलेले प्रवासी बाळू दाभाडे म्हणाले.
...तर मनपाकडे मागणी
दुभाजकात मोकळी जागा ठेवण्यासंदर्भात प्रवाशांकडून मागणी आली तर महापालिकेकडे मागणी केली जाईल, असे एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक अरुण सिया म्हणाले.
फोटो ओळी....
मध्यवर्ती बसस्थानकासमोर प्रवाशांना अशाप्रकारे जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे.