‘एमआयएम’ची विरोधकांकडून नाकाबंदी
By Admin | Updated: April 14, 2015 00:59 IST2015-04-14T00:59:39+5:302015-04-14T00:59:39+5:30
औरंगाबाद : मजलीस- ए- इत्तेहाद- उल- मुस्लिमीन (एमआयएम) पक्षावर संकटाचे ढग दिवसेंदिवस आणखी गडद होत आहेत. काळे ढग अधूनमधून कधीही धो-धो बरसत आहेत

‘एमआयएम’ची विरोधकांकडून नाकाबंदी
औरंगाबाद : मजलीस- ए- इत्तेहाद- उल- मुस्लिमीन (एमआयएम) पक्षावर संकटाचे ढग दिवसेंदिवस आणखी गडद होत आहेत. काळे ढग अधूनमधून कधीही धो-धो बरसत आहेत. अचानक गारांचा माराही होतो. त्यामुळे पक्ष डॅमेज कंट्रोलमधून बाहेर निघायलाच तयार नाही. पक्षाच्या दोन नेत्यांनी शहरात एकच जाहीर सभा घेतल्यावर सर्व काही आलबेल होईल, या आशेवर जगणारे पक्ष कार्यकर्ते आणि उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. कारण ऐतिहासिक आमखास मैदानावर आता ‘एमआयएम’ला जाहीर सभाच घेता येणार नाही.
‘मोहोब्बत’ आणि ‘जंग’मध्ये सर्व काही चालते, असे बोलले जाते. महापालिका निवडणुकीच्या कुरुक्षेत्रात ‘एमआयएम’ पक्ष पूर्णपणे चक्रव्यूहात सापडला आहे. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये खा. असदोद्दीन ओवेसी आणि त्यांचे भाऊ अकबरोद्दीन ओवेसी यांनी दोन जाहीर सभा घेऊन मुस्लिम मतांमध्ये ‘इत्तेहाद’(एकता) घडवून आणली होती. अशीच काहीशी किमया महापालिका निवडणुकीमध्ये ओवेसी बंधू करतील या दृष्टीने पक्ष कामाला लागला आहे. शहरात ५४ वॉर्डांमध्ये एमआयएमने उमेदवार उभे केले आहेत. त्यातील अनेकांना तर ‘पतंग’ चिन्ह मिळालेच नाही. ऐनेवेळी ज्या उमेदवारांचे तिकीट कापण्यात आले ते ‘एमआयएम’ची ‘न भूतो न भविष्यती’ अशी घेराबंदी करीत आहेत.
वॉर्ड क्र. ११ विश्वासनगर- हर्षनगरमधून एमआयएमकडून अगोदर अय्युब खान यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. एका रात्रीतून त्यांची उमेदवारी कापून जिल्हाध्यक्ष जावेद कुरैशी स्वत: या वॉर्डात आले. त्यामुळे अय्युब खान यांनी लगेचच काँग्रेसकडून उमेदवारी मिळविली.
आता कुरैशी आणि खान आमनेसामने लढत आहेत. ‘एमआयएम’ची कोंडी करण्यासाठी खान यांचे लहान भाऊ माजेद खान यांनी आमखास मैदान २० एप्रिलपर्यंत ‘आमखास प्रीमियर लीग’ घेण्यासाठी आरक्षित करून ठेवले आहे. त्यांनी पोलीस, महापालिका आणि विविध शासकीय कार्यालयांचे ना हरकत प्रमाणपत्रही घेतले आहे. ‘लोकमत’शी बोलताना माजेद खान यांनी सांगितले की, कोणाची कोंडी करण्याचा आमचा अजिबात हेतू नाही. क्रिकेट स्पर्धा आम्ही नेहमीच घेत असतो. यंदाही आम्ही १५ एप्रिलपासून स्पर्धा घेत आहोत.
आमखास मैदान २० एप्रिलपर्यंत विरोधकांनी आरक्षित केल्याची कुणकुण ‘एमआयएम’च्या स्थानिक नेत्यांनाही लागली आहे. त्यांनी ओवेसी बंधूंच्या जाहीर सभेसाठी पर्यायी जागेचा शोध सुरू केला आहे. अजूनपर्यंत मोठी आणि सुरक्षित जागा त्यांना मिळालेली नाही.