तीर्थपुरीच्या घटनेमुळे जिल्ह्यात नाकाबंदी
By Admin | Updated: September 2, 2014 01:50 IST2014-09-02T00:29:29+5:302014-09-02T01:50:24+5:30
जालना : महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या तीर्थपुरी शाखेसाठी जालना येथून नेण्यात आलेली २० लाखांची रक्कम खापरदेव हिवरा या गावालगत चोरट्यांनी भरदिवसा कार अडवून चोरून नेल्याची घटना सोमवारी घडली.

तीर्थपुरीच्या घटनेमुळे जिल्ह्यात नाकाबंदी
जालना : महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या तीर्थपुरी शाखेसाठी जालना येथून नेण्यात आलेली २० लाखांची रक्कम खापरदेव हिवरा या गावालगत चोरट्यांनी भरदिवसा कार अडवून चोरून नेल्याची घटना सोमवारी घडली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
सदर घटनेत २० लाखांची रोकड घेऊन जाणाऱ्या कारमधील दोघांना चोरट्यांनी अडवून चाकूचा धाक दाखवत रोकड लांबविली. विशेष म्हणजे ही घटना दुपारी २.३० वाजता घडली. शहरासह जिल्ह्यात चोऱ्या, घरफोड्या व लुटमारीच्या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून त्यामुळे पोलिसांसमोर चोरट्यांनी आव्हान उभे केले आहे.
यासंदर्भात पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंग यांनी सांगितले, चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. गोंदी पोलिस ठाण्यासह आसपासच्या पोलिस ठाण्यांनाही सतर्क करण्यात आले आहे. नाकाबंदीही लावण्यात आली आहे. या प्रकारच्या घटना टाळण्यासाठी पैसे घेऊन जाणाऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
पाठलाग होत असल्यास सावध होऊन दक्षता बाळगणे गरजेचे आहे. संशयास्पद व्यक्ती दिसून आल्यास तात्काळ पोलिसांना खबर द्यावी, असे आवाहन सिंग यांनी केले. (प्रतिनिधी)