कर्मचाऱ्यांअभावी रक्तविलगीकरण केंद्राला खीळ
By Admin | Updated: October 7, 2014 00:15 IST2014-10-07T00:06:59+5:302014-10-07T00:15:28+5:30
उस्मानाबाद : जिल्हा रूगणालयातील रक्तविलगीकरण केंद्रास प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतरही यंत्रणा सुरू करण्यासाठी कर्मचाऱ्यांअभावी खीळ बसत आहे़

कर्मचाऱ्यांअभावी रक्तविलगीकरण केंद्राला खीळ
उस्मानाबाद : जिल्हा रूगणालयातील रक्तविलगीकरण केंद्रास प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतरही यंत्रणा सुरू करण्यासाठी कर्मचाऱ्यांअभावी खीळ बसत आहे़ बदलीनंतर आवश्यक तो कर्मचारी वर्ग उपलब्ध होवू न शकल्याने केवळ यंत्रणेची चाचणी करण्यात आली आहे़ त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांची प्लाझमासह प्लेटलेट, पीसीव्ही इतर बाबींसाठी हेळसांड पूर्ववत सुरूच आहे़
समस्यांनी ग्रस्त असलेल्या जिल्हा रूग्णालयात रक्तविलगीकरण केंद्र सुरू होणार असल्याने रूग्णांसह नातेवाईकांमधून समाधान व्यक्त होत होते़ या रक्तविलगीकरण केंद्रास शासनाची मंजुरी मिळावी, यासाठी जवळपास दीड-दोन वर्षे पाठपुरावा करण्यात आला आहे़ यासाठी स्वतंत्र इमारत उभी करण्यात आली असून, सेंन्ट्रीफ्यूज मशीन, प्लाझमा एक्सप्रेसर, प्लेटलेट अॅझिटेटर आदी आवश्यक त्या यंत्रणाही उभारण्यात आल्या आहेत़ या बाबींची दिल्ली येथील टीमने पाहणी केल्यानंतर अहवाल वरिष्ठांकडे गेला होता़ त्यानंतर दिल्ली येथील एफडीएने (अन्न व औषध प्रशासन) प्रस्तावास मंजुरी देवून परवाना दिला आहे़ जिल्हा रूग्णालयास परवाना मिळून महिन्याचा कालावधी लोटला तरी केवळ चाचणी करून ही यंत्रणा बंद ठेवण्यात आली आहे़ येथील रक्तसंकलन विभागात ०६ पैकी तीन कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत़ तर एक प्रशिक्षणासाठी गेला आहे़ दोन कर्मचाऱ्यांना सोडण्यात आले असून, एकाची बदली झाली असली तरी तो तेथेच कार्यरत आहे़ सर्व यंत्रणा उपलब्ध असतानाही कर्मचाऱ्यांअभावी ही यंत्रणा धूळ खात पडली असून, रूग्णांसह नातेवाईकांची फरफट कायम आहे़ (प्रतिनिधी)