भाजपाचे भरोसे यांचा वकिलांशी संवाद
By Admin | Updated: October 13, 2014 23:34 IST2014-10-13T23:31:24+5:302014-10-13T23:34:45+5:30
परभणी विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार आनंद भरोसे यांनी सोमवारी जिल्हा न्यायालयातील वरिष्ठ वकिलांशी संवाद साधला.

भाजपाचे भरोसे यांचा वकिलांशी संवाद
परभणी विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार आनंद भरोसे यांनी सोमवारी जिल्हा न्यायालयातील वरिष्ठ वकिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शहरात उद्योगधंदे नसल्यामुळे बेरोजगारांची संख्या वाढली आहे. शिवाय शहरात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. आजपर्यंत मतदारसंघात केवळ भावनिक राजकारण केले गेले; परंतु, आता जनतेला विकास पाहिजे आहे व भाजपा विकासासाठी कटीबद्ध आहे. त्यामुळे विकासासाठी निवडून देण्याचे आवाहन केले.
देशात भाजपाची एकहाती सत्ता असल्याने राज्यात भाजपाला एकहाती सत्ता द्यावी. जेणेकरुन राज्याच्या विकासात अडचण निर्माण होणार नाही, असेही यावेळी भरोसे म्हणाले. विरोधकांकडे कुठलाही विषय नाही. त्यामुळे त्यांच्याकडून खोटा प्रचार केला जात असल्याचे ते म्हणाले.
सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार- विजय भांबळे
परभणी: जिंतूर मतदारसंघातील नागरिकांना वीज, पाणी या सुविधा पुरविण्यासाठी आपण तन, मन, धनाने काम करणार असून, मतदारांनी काम करण्याची संधी द्यावी, असे आवाहन जिंतूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांनी केले़ जिंतूर तालुक्यातील बोरी येथे १३ आॅक्टोबर रोजी भांबळे यांची जाहीर सभा झाली़ या प्रसंगी मार्गदर्शन करताना भांबळे म्हणाले, बोरी व परिसरात असलेल्या रस्ते, वीज आणि पाण्याच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत़ त्याच प्रमाणे श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी देखील प्रयत्न करू़ या मतदार संघात यापूर्वीही सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर मी काम केले आहे़ अन्यायग्रस्त नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावरही उतरलो़ आता विधानसभेच्या माध्यमातून ही कामे मार्गी लावण्यासाठी आपल्याला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले़ माजी खा़ गणेशराव दुधगावकर, अशोकराव चौधरी, यशवंतराव चौधरी, अनंतराव चौधरी, अजय चौधरी, शेरू भाई, रामेश्वर जावळे, अर्जुन वजीर, भगवान चौधरी, शशीकांत चौधरी, प्रताप राठोड उपस्थित होते़
सिंचन सुविधा निर्माण करून देऊ-रामप्रसाद बोर्डीकर
परभणी : जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सिंचन सुविधा निर्माण करून या तालुक्यात विकासाची गंगा खेचून आणू असे आश्वासन जिंतूर विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांनी दिले़ १३ आॅक्टोबर रोजी जिंतूर तालुक्यातील अंबरवाडी येथे त्यांनी कॉर्नर बैठक घेऊन मतदारांना मार्गदर्शन केले़ ते म्हणाले, माझ्या कार्यकाळात आपण बेरोजगारी दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला़ रोजगार आणि मतदार संघाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केला़ संबंधितांकडे पाठपुरावा केला आहे़ यापुढेही जिंतूर तालुक्यात विकासाची गंगा आणण्यासाठी सिंचनाच्या सुविधा निर्माण करू असे आश्वासन त्यांनी दिले़ आ़ बोर्डीकर म्हणाले, तालुक्याच्या विकासकामांमध्ये राजकारणाचा कधीही अडथळा आणला नाही़ सर्व नागरिकांना सोबत घेऊन त्यांचा विकास साधण्याचे काम आपण केले़ माजी आ़ कुंडलिकराव नागरे, जि़प़ सदस्य शिवाजीराव देशमुख, जि़ प़ सदस्य भगवानराव वटाणे, नामदेवराव घुले, कासाबाई बुधवंत आदींसह माधवराव घुगे, श्यामसुंदर मस्के, प्रभु जाधव, अशोक लांडगे, शिंदे, संतोष घोगरे आदींची उपस्थिती होती़