औरंगाबाद लोकसभेसाठी भाजप पूर्ण ताकदीनिशी उतरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 01:02 IST2017-10-06T01:02:05+5:302017-10-06T01:02:05+5:30
भाजपला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ पूर्ण ताकदीनिशी ताब्यात घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवा, असे पक्षाचे निरीक्षक महेंद्रसिंग यांनी पक्षक़ार्यकर्त्यांच्या बैठकीत गुरुवारी स्पष्टच करुन टाकले

औरंगाबाद लोकसभेसाठी भाजप पूर्ण ताकदीनिशी उतरणार
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : भाजपला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ पूर्ण ताकदीनिशी ताब्यात घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवा, असे पक्षाचे निरीक्षक महेंद्रसिंग यांनी पक्षक़ार्यकर्त्यांच्या बैठकीत गुरुवारी स्पष्टच करुन टाकले. मतदारसंघाचा पूर्ण लेखाजोखा पक्षाकडे आहे. आजची बैठक प्रातिनिधिक होती; परंतु पुढच्या १५ दिवसांनंतर होणारी बैठक चक्रव्यूह रचनेसारखी असणार आहे, असेही ते म्हणाले.
मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी आणि नांदेड या तीन जिल्ह्यांत महेंद्रसिंग चाचपणी करून त्याचा अहवाल पक्षाध्यक्ष अमित शहा यांना देणार आहेत. त्यांनी पूर्ण मराठवाड्याचा दौरा केल्यानंतर औरंगाबादेत शेवटची बैठक घेतली. शिवसेनेसोबत युती होणार नाही, असे स्पष्ट संकेत बैठकीत देण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाबाबत जोरदार चर्चा आहे. सध्या हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात असून तो शिवसेनेचा गड मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे औरंगाबाद मतदारसंघातून उमेदवार देण्याची तयारी सुरु केल्याचे या बैठकीतून स्पष्टपणे समोर आले.
दरम्यान गुरुवारी झालेल्या पक्षकार्यकर्त्यांच्या बैठकीवर महेंद्रसिंग समाधानी नसल्याचे भाजप गोटातून समजले. मराठवाड्यात औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी सेनेकडे तर हिंगोली, नांदेडचे काँग्रेस खासदार आहेत. जालना, लातूर, बीड भाजपकडे आहे.
महेंद्रसिंग यांनी पक्षातील स्थानिक नेते, पदाधिकाºयांची चांगलीच परीक्षा घेतली. मतदारसंघ क्रमांकापासून तर बुथ बांधणीपर्यंतची सर्व जंत्री त्यांच्याकडे असल्यामुळे विद्यमान खासदार, आमदारांची त्यांनी केलेल्या प्रश्नांमुळे तारांबळ उडाली. पं.दीनदयाल, श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जन्मतिथी, जालना व औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा क्रमांक किती, असे प्रश्न त्यांनी केले. त्याची उत्तरे उपस्थिताना देता आली नाहीत.
बैठकीला खा. रावसाहेब दानवे यांना उशीर झाला. तत्पूर्वीच बैठक सुरू झाली होती. यावेळी औरंगाबादचे प्रभारी खा. अमर साबळे, आ. अतुल सावे, प्रवक्ते शिरीष बोराळकर, आ. प्रशांत बंब, उपाध्यक्ष डॉ.भागवत कराड, जिल्हाप्रमुख एकनाथ जाधव, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, संघटनमंत्री भाऊराव देशमुख यांची उपस्थिती होती.