भाजपाचे दुकान बनवाबनवीचे
By Admin | Updated: October 6, 2014 00:42 IST2014-10-06T00:21:26+5:302014-10-06T00:42:47+5:30
करमाड/कन्नड : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही अस्मितेची लढत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अच्छे दिन आने वाले हैं असे बोलून मतदारांची दिशाभूल करीत आहेत.

भाजपाचे दुकान बनवाबनवीचे
करमाड/कन्नड : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही अस्मितेची लढत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अच्छे दिन आने वाले हैं असे बोलून मतदारांची दिशाभूल करीत आहेत. ‘खोटे बोल; पण रेटून बोल, त्याचे नाव नरेंद्र मोदी,’ असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रचार प्रमुख नारायण राणे यांनी केला.
ते काँग्रेसचे फुलंब्री मतदारसंघाचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांच्या प्रचार सभेत करमाड येथे बोलत होते. यावेळी झालेल्या जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे होते, तर प्रमुख उपस्थितीत विधानसभेचे उमेदवार रवींद्र काळे उपस्थित होते. याशिवाय कन्नडचे काँग्रेसचे उमेदवार नामदेव पवार यांच्या प्रचारार्थही कन्नडमध्ये सभा झाली.
यावेळी नारायण राणे यांनी सांगितले की, सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवीत आहेत. मोदी सरकारची लाट ओसरत चालल्यामुळे भाजपाला ४ सभेवरून २५ सभा घेण्याची गरज पडली आहे. मोदी यांनी लोकांना अच्छे दिन आनेवाले हैं, असे खोटे स्वप्न दाखवून निवडणूक जिंकली; परंतु रेल्वे भाडे वाढविले. महागाई कमी झाली नाही. कांदा इजिप्तमधून आयात करून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्याची वल्गना करणाऱ्या मोदींना आता ‘ईट का जवाब पत्थर से’ का देता येत नाही? त्यांचा आवेश कुठे गेला, असा प्रश्न त्यांनी केला.
शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागणाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी एक रुपयाही दिला नाही; परंतु सरदार पटेलांच्या स्मारकासाठी २०० कोटी रुपयांचा निधी दिला. संयुक्त महाराष्ट्रासाठी १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिले, तेव्हा मुंबई महाराष्ट्राला मिळाली; परंतु मोदी यांनी मुंबईची गोदी बंद करून गुजरातला नेली, तसेच रिझर्व्ह बँक दिल्लीला हलविली. त्यांची नजर मुंबईतील १८०० एकर जमिनीवर असून, ती गुजरातच्या उद्योगपतींच्या घशात घालणार आहे. गुजरातींनी व्यापार करावा; परंतु महाराष्ट्राच्या नादी लागू नये, असा सज्जड दमही त्यांनी दिला.
करमाडच्या सभेला सभापती सुनील हरणे, उपसभापती शंकरराव ठोंबरे, सरसाबाई वाघ, डॉ. दिलावर मिर्झा, भास्करराव मुरमे, अॅड. रमेश जाधव, गणेश पाटील दहीहंडे, दामूअण्णा करमाडकर, जहीरभाई करमाडकर, ज्ञानदेव उकर्डे, भगवान मुळे, गणेश उकर्डे, जगन्नाथ काळे, कडूबाबा सोळुंके, पंचायत समिती सदस्य गजानन मते, मनोज शेजूळ यांची उपस्थिती होती.
करमाड येथे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गंगाधर पाटील सोनवणे, बाजार समितीचे संचालक राजेंद्र चव्हाण, माजी सभापती सिद्धेश्वर भागवत, दामू भालेराव, संदीपराव पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामुळे राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे.