विधानसभेत मतांच्या टक्केवारीत भाजपा नंबर १ !
By Admin | Updated: October 21, 2014 00:57 IST2014-10-21T00:33:34+5:302014-10-21T00:57:22+5:30
आशपाक पठाण ,लातूर विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर जिल्ह्यात भाजपाने मुसंडी मारली आहे. मताधिक्यात भाजपाच पहिल्या

विधानसभेत मतांच्या टक्केवारीत भाजपा नंबर १ !
आशपाक पठाण ,लातूर
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर जिल्ह्यात भाजपाने मुसंडी मारली आहे. मताधिक्यात भाजपाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून पुढे आला आहे. जवळपास १२ हजार मतांच्या फरकाने काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मनसेचा क्रमांक आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपालाच मताधिक्य होते. विधानसभेत लोकसभेसारखी किमया चालली नसली, तरी पक्षाचे वजन लातूर जिल्ह्यात वाढले आहे. भाजपाचे वाढते मताधिक्य काँग्रेससाठी डोकेदुखी ठरणार आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत लातूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक ३ लाख ९५ हजार २५२ मते घेऊन पहिला क्रमांक मिळविला. तर काँग्रेस पक्ष ३ लाख ८३ हजार ९१ मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस १ लाख २७ हजार ५३२ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर, शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ ८८ हजार ५५२ मते घेऊन चौथ्या क्रमांकावर तर मनसेचे ‘इंजिन’ २७ हजार ८३ मते घेऊन पाचव्या क्रमांकावर आले आहे.
लोकनेते विलासराव देशमुख, पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी मंत्री आ. दिलीपराव देशमुख यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या लातूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आपले वर्चस्व राखले होते.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे चार आमदार निवडून आले होते. तर एक राष्ट्रवादी व एक जागा भाजपाला मिळाली होती. सहापैकी चार ठिकाणी निवडून आलेल्या काँग्रेसचे मताधिक्य अधिक असल्याने लातूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. लोकसभा निवडणुकीपासून बालेकिल्ल्याला सुरुंग लागला. लातूर शहर व लातूर ग्रामीण या दोन्ही मतदारसंघांत भाजपाचा पराभव झाला असला, तरी मताधिक्य मात्र चांगलेच वाढले आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत लातूर शहरमधून काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री अमित देशमुख यांना १ लाख १३ हजार ००६ मते मिळाली होती. तर ग्रामीणमधून माजी आ. वैजनाथ शिंदे यांना ८६ हजार १३६ मते मिळाली होती. तर २०१४ च्या निवडणुकीत लातूर ग्रामीणमधून विजयी झालेले काँग्रेसचे आ. त्रिंबकनाना भिसे यांना १ लाख ८९७ मते मिळाली आहेत. भाजपाचे उमेदवार रमेश कराड यांना मागील निवडणुकीत ६२ हजार ५५३ मते मिळाली होती.
या निवडणुकीत त्यांचे तब्बल २८ हजार मते वाढली आहेत. ९० हजार ३८७ मते घेऊन ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. एकंदरित, लातूर शहर मतदारसंघात भाजपाचे मताधिक्य वाढले आहे.