अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर भाजपचे उपोषण मागे
By | Updated: December 4, 2020 04:08 IST2020-12-04T04:08:27+5:302020-12-04T04:08:27+5:30
फुलंब्री - तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोहित्र जळालेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना रबी हंगामात पिकाला पाणी देणे शक्य होत नाही. हे ...

अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर भाजपचे उपोषण मागे
फुलंब्री - तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोहित्र जळालेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना रबी हंगामात पिकाला पाणी देणे शक्य होत नाही. हे रोहित्र तत्काळ देण्यात यावे, या मागणीसाठी भाजपच्या वतीने बुधवारी महावितरण कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेत लवकरच समस्या सोडवू, असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
यंदा पाऊस चांगला झाल्याने रबीसाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रबी पिकाची पेरणी केली. यात गव्हाची पेरणी चांगली आहे. रबी पिकांना पाणी देण्याची वेळ आली असताना दुसरीकडे तालुक्यातील बहुतांश शिवारातील रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी पिकाला पाणी देणे शक्य होईना. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. हाच मुद्दा घेत भाजपच्या वतीने जळालेले रोहित्र त्वरित दुरुस्त व बदलून देण्यात यावे, अशी मागणी करीत महावितरणकडे केली होती. अन्यथा, आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल, असा इशारा देण्यात आला.
बुधवारी भाजपच्या वतीने अखेर महावितरणला जागे करण्यासाठी उपोषण केले. यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता आर. एम. काळे व उपअभियंता अरुण गायकवाड यांनी बंद पडलेले रोहित्र येत्या आठ दिवसांत बदलून देण्यात येतील, असे आश्वासित केले. आ. हरीभाऊ बागडे यांनी मध्यस्थी करीत अधिकाऱ्यांशी संवाद साधला. अखेर उपोषण मागे घेण्यात आले. भाजप तालुकाध्यक्ष सुहास शिरसाठ, जि.प. सदस्य शिवाजीराव पाथ्रीकर, सर्जेराव मेटे, बाळासाहेब तांदळे, गजानन नागरे, योगेश मिसाळ, राम बनसोड, रामेश्वर चोपडे, मयूर कोलते, वाल्मिक जाधव, अजय शेरकर, एकनाथ ढोके, सुमित प्रधान,रवींद्र काथार, भगवान निराशे, कृष्णा पाथ्रे,अजय नागरे, आकाश गोरावने, गणेश नागरे, आबासाहेब फुके, अरुण तुपे, सांडू हापत, गुलाब पटेल, योगेश म्हस्के उपोषणात सहभागी झाले होते.
फोटो कॅप्शन - भाजपचे तालुकाध्यक्ष सुहास सिरसाठ यांनी सुरू केलेले उपोषण सोडविताना आ. हरिभाऊ बागडे, महावितरणचे अधिकारी आर. एम. काळे, अरुण गायकवाड आदी.