तर भाजप काढणार वचपा
By Admin | Updated: October 26, 2016 01:01 IST2016-10-26T00:48:21+5:302016-10-26T01:01:40+5:30
औरंगाबाद : महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी काऊंटडाऊन सुरू झाले आहे. ३१ आॅक्टोबर रोजी विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपत आहे.

तर भाजप काढणार वचपा
औरंगाबाद : महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी काऊंटडाऊन सुरू झाले आहे. ३१ आॅक्टोबर रोजी विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपत आहे. निवडणुका पुढे ढकलण्यासाठी पदाधिकारी सर्व ‘लाईफ लाईन’चा वापर करीत आहेत. सेनेने नियोजित वेळेतच महापौरपद न सोडल्यास भविष्यात भाजपही वचपा काढण्यासाठी राजीनामा सत्र लांबवू शकते. यापूर्वी महापालिकेत असे गंभीर प्रसंग निर्माण झालेले आहेत.
महापौर-उपमहापौर निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना-भाजपमधील राजकारण ढवळून निघत आहे. दोन्ही पक्षात हालचालींना कमालीचा वेग आला असून, दिवाळीनंतर लगेच निवडणूक कार्यक्रम घ्यावा यासाठी भाजपकडून जोरदार दबावतंत्र सुरू आहे. शहर विकास आराखड्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने विद्यमान पदाधिकारीही निवडणूक प्रक्रियेत विलंब आणत आहेत. ३१ डिसेंबरला विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपताच त्यांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे.
यंदा भाजपला फक्त ३६५ दिवसांसाठीच महापौरपदाचा कार्यकाळ मिळणार आहे. त्यातही एक महिना विलंब झाल्यास ११ महिन्यांसाठी हे पद कशासाठी घ्यावे अशीही चर्चा भाजपच्या कोअर कमिटीने सुरू केली आहे.
सध्या भाजपचे उपमहापौर तर सेनेचे महापौरपदावर आरूढ आहेत. भाजप आपल्या उपमहापौरांचा राजीनामा नियोजित वेळेत घेण्यास सरसावली आहे.
सेनेचीही दिवाळी संपताच राजीनामा द्यावा असा आग्रह धरण्यात येतोय. यापूर्वी महापालिकेत तत्कालीन सेनेचे उपमहापौर भाऊसाहेब वाघ यांनी नियोजित वेळेत राजीनामा दिला होता. भाजपचे महापौर डॉ. भागवत कराड यांनी राजीनामा उशिरा दिल्याने सेनेची बरीच गोची झाली होती.
महापौर-उपमहापौरांनी दिवाळीनंतर चीनचा दौरा काढला आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे भाजपचेच महापौर चीन दौऱ्यावर कसे काय जाऊ शकतात असाही प्रश्न निर्माण होत आहे.