आमिष दाखवून काँग्रेसचे नगरसेवक फोडण्याचा भाजपाकडून प्रयत्न !
By Admin | Updated: April 30, 2017 23:51 IST2017-04-30T23:45:29+5:302017-04-30T23:51:15+5:30
लातूर :भाजपाकडून काँग्रेसचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख यांनी येथे रविवारी पत्रपरिषदेत केला.

आमिष दाखवून काँग्रेसचे नगरसेवक फोडण्याचा भाजपाकडून प्रयत्न !
लातूर : आमच्यात या, हवं तर राजीनामा द्या, तुमचा झालेला खर्च आणि पुढील निवडणुकीचा सारा खर्च आम्ही करू. हवे तितके पैसे मागा, निवडणुकीत पडलात तरी स्वीकृत सदस्य करू, अशी प्रलोभने व आमिष दाखवून भाजपाकडून काँग्रेसचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख यांनी येथे रविवारी पत्रपरिषदेत केला.
मोईज शेख म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल काँग्रेस पक्षाने मान्य केला आहे. निवडणुकीचे निकाल जाहीर होताच समर्थ विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावण्याची आणि लातूरच्या हिताच्या प्रश्नात सहकार्य करण्याची भूमिका माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे. मात्र भाजपाकडून कटकारस्थाने सुरू आहेत. त्याचे भक्कम पुरावे आमच्याकडे आहेत. या फोडाफोडीच्या राजकारणात त्यांनी विनाकारण पडू नये. नाही तर आम्ही सारे पुरावे जनतेसमोर मांडू. स्वत:ला सुसंस्कृत आणि सभ्य समजणाऱ्या भाजपातील मंडळींनी वेळीच सावध व्हावे. काँग्रेसचे नगरसेवक फुटीर नाहीत. पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्यांना प्रलोभने दाखवून भाजपाने लोकशाहीचा आणि मतदारांचा अवमान करू नये. निवडणुकीत जनतेने दिलेला कौल बोलका आहे. त्यामुळे फारशा फुशारक्या न मारता विरोधकांना सोबत घेऊन सौहार्दाचे राजकारण करावे. अन्यथा आम्हीही जशास तसे उत्तर देऊ शकतो, असा इशाराही मोईज शेख यांनी या पत्रपरिषदेत दिला. पत्रपरिषदेला महापौर अॅड. दीपक सूळ, स्थायी समितीचे सभापती विक्रांत गोजमगुंडे, माजी महापौर प्रा. स्मिता खानापुरे, सपना किसवे, शंकर गुटे आदींची उपस्थिती होती.