‘भाजपा’च्या डरकाळ्या हवेतच!
By Admin | Updated: April 19, 2015 00:48 IST2015-04-19T00:35:36+5:302015-04-19T00:48:29+5:30
लातूर : जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत काँग्रेसचे आठजण बिनविरोध निवडून आले आहेत़ तर अन्य काही ठिकाणचे उमेदवार बिनविरोध काढण्याची तयारी जोरात सुरू आहे़

‘भाजपा’च्या डरकाळ्या हवेतच!
लातूर : जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत काँग्रेसचे आठजण बिनविरोध निवडून आले आहेत़ तर अन्य काही ठिकाणचे उमेदवार बिनविरोध काढण्याची तयारी जोरात सुरू आहे़ जिल्हा बँकेची निवडणूक ‘ताकदीनिशी’ लढणार ही भाजपा जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे यांची डरकाळी हवेतच राहण्याची चिन्हे आहेत. कारण अद्यापही भाजपाची रणनिती काय ? हे गुलदस्त्यातच आहे. १९ पैकी८ जागा बिनविरोध काढून काँग्रेसने भाजपा इच्छुकांना चांगलाच झटका दिला आहे.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे़ सहकार क्षेत्रातील यापूर्वीच्या सर्वच निवडणुकीत काँग्रेसचा आणि त्यातल्या त्यात देशमुख गटाचा प्रभाव दिमाखदार विजयातून दिसून आला आहे़मांजरा परिवाराने तीनही कारखाने विरोधकांचे डिपॉजिट जप्त करुन राखले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सुरुवातीलाच आठ जागा बिनविरोध निघाल्याने इथेही आ. दिलीपराव देशमुखांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस बाजी मारणार असे चित्र आहे.
लातूर जिल्हा बँकेवर पूर्वीपासून काँग्रेसची सत्ता राहीली आहे. तरीही भाजपाचे जिल्हाध्यक्ष निडवदे यांनी जिल्हा बँक निवडणुकीसाठी कंबर कसली होती. कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निवडणुक रंगविण्याचा सूचक इशारा दिला. नानाविध कार्यकर्त्यांनी अर्ज केल्याने एक पॅनल उभे राहील अशी शक्यताही निर्माण झाली. परंतु अर्ज छाननीतच काँग्रेसच्या चौघांची बिनविरोध निवड झाली तर अर्ज माघारी घेण्याच्या पहिल्याच दिवशी सात जणांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने पुन्हा काँग्रेसच्या चौघांची बिनविरोध निवड झाली. यामध्ये आ़ दिलीपराव देशमुख, संभाजी सुळ, शिवकन्या पिंपळे, स्वयंप्रभा पाटील, नाथसिंह देशमुख, प्रमोद जाधव, सुभाष देशमुख , पृथ्वीराज सिरसाठ यांचा समावेश आहे़
सध्या उमेदवाराची पडताळणी केली जात असून निवडणूकीसंदर्भात मित्र पक्षासोबत बैठक घेण्यात येणार आहे. २० ते २२ एप्रिलच्या दरम्यान ही बैठक होईल़ यानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत आपल्या समोर सर्व बाबी स्पष्ट होतील अशी, प्रतिक्रीया भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़