भाजपाची सदस्य नोंदणी एक कोटी
By Admin | Updated: April 20, 2015 00:30 IST2015-04-20T00:12:49+5:302015-04-20T00:30:20+5:30
जालना : भारतीय जनता पार्टीची गेल्या चार महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या सदस्य नोंदणीने एक कोटीचा आकडा पूर्ण केला

भाजपाची सदस्य नोंदणी एक कोटी
जालना : भारतीय जनता पार्टीची गेल्या चार महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या सदस्य नोंदणीने एक कोटीचा आकडा पूर्ण केला. जिल्ह्याचे सुपुत्र व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे उद्दिष्ट पूर्ण झाल्याबद्दल पक्षाच्या जिल्हा कार्यालयासमोर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रविवारी आनंदोत्सव साजरा केला.
संपूर्ण महाराष्ट्रात कार्यकर्त्यांनी ही नोंदणी मोठ्या प्रमाणावर करून उद्दिष्ट पूर्ण केले. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी राज्यातील पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. ही सदस्य नोंदणी कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ असून देशात एकूण सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट १० कोटी होते. त्यापैकी महाराष्ट्र राज्याने एक कोटी सदस्य नोंदवून १० टक्के वाटा उचलला आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दुरध्वनीवरून संवाद साधून खा. दानवे यांचे अभिनंदन केले आहे.
जालना जिल्ह्यास २ लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ते जिल्ह्याने पूर्ण केल्याबद्दलही प्रदेशाध्यक्ष दानवे व पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत केले आहे. या सदस्य नोंदणीचा कार्यक्रम ३० एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, आज सकाळी पक्षाच्या जिल्हा कार्यालयासमोर पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून, पेढे वाटप करून जल्लोष केला. यावेळी माजी आमदार अरविंद चव्हाण, भास्कर दानवे, उपसभापती रामेश्वर भांदरगे, सुभाष पालवे, सुधाकर खरात, सिद्धिविनायक मुळे, रवींद्र देशपांडे, सुधाकर शिंदे, सुरेश कदम, मनोज बीडकर, अनिरुद्ध शेळके, अमरदिप शिंदे, दाभाडे, नामदेव नागवे, संजय डोंगरे, कोल्हे, जोशी (प्रतिनिधी)