छत्रपती संभाजीनगर : भाजप मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे यांच्याविरोधात विभागातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये खदखद वाढत चालली आहे. अंतर्गत गटबाजीचा हा प्रकार विकाेपाला गेला असून, सोशल मीडियातून मेसेज व्हायरल करण्यापर्यंत हे प्रकरण गेले आहे. संघटनेत वाढ होण्याऐवजी नुकसान होत असल्याची टीका पदाधिकारी सोशल मीडियातून करू लागले आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गेल्या आठवड्यात सूत्रे हाती घेतली. विभागाचे संघटन मंत्री बदलावेत, अशी मागणी अनेकांनी त्यांच्याकडे केल्याचे भाजप गोटातून सांगण्यात आले. तसेही पक्षात प्रदेशाध्यक्ष बदलल्यानंतर पूर्ण संघटनात्मक फळी बदलण्यात येते, त्यामुळे कौडगे यांच्याबाबत पक्ष काय निर्णय घेणार, याकडे नाराज पदाधिकाऱ्यांचे लक्ष आहे.
सध्या विभागातील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मे महिन्यात नांदेडमध्ये झालेल्या डीपीसी बैठकीतदेखील पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली होती. नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे आहेत. त्यांना कार्यकर्ते, पदाधिकारी भेटण्याचा प्रयत्न करतात, त्यांना कौडगे भेटू देत नाहीत. सामान्य कार्यकर्त्यांची ही तक्रार होती. याप्रकरणी नांदेडचे पालकमंत्री सावे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. महापालिका निवडणुका आगामी काळात होणार आहेत. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी व लातूर या महापालिका आहेत. तत्पूर्वी पक्षाने या सगळ्यावर तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरीत आहे.
पक्षाने पुन्हा संधी देऊ नयेपक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक न देता संघटन मंत्री संजय कौडगे हे अनेक एकनिष्ठ कार्यकर्त्यांचे नुकसान करीत आहेत. त्यांची या पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी प्रदेशाकडे केली आहे.- रामभाऊ सूर्यवंशी, भाजपा युवा मोर्चा विधानसभा अध्यक्ष, हिमायतनगर
आरोपांमध्ये तथ्य नाहीआरोप करणाऱ्यांवर पक्षाची काहीही जबाबदारी नाही. त्यांच्या आरोपांवर मला काहीही उत्तर द्यायचे नाही. त्यांना पक्षातून बाहेर काढलेले आहे. पक्षाच्या नियमानुसारच माझे काम आहे. त्यात कुणालाही डावलण्याचा, जवळ करण्याचा मुद्दाच नाही.- संजय कौडगे, संघटन मंत्री, भाजप