भाजपने दिली ११ उपऱ्यांना उमेदवारी !

By Admin | Updated: February 4, 2017 23:41 IST2017-02-04T23:40:48+5:302017-02-04T23:41:32+5:30

लातूर : निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन आपल्या पक्षास सोडचिठ्ठी देत डेरेदाखल झालेल्या ११ उपऱ्यांना भाजपाने उमेदवारी बहाल केली आहे़

BJP has given 11 candidates for the election! | भाजपने दिली ११ उपऱ्यांना उमेदवारी !

भाजपने दिली ११ उपऱ्यांना उमेदवारी !

लातूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन आपल्या पक्षास सोडचिठ्ठी देत भाजपात डेरेदाखल झालेल्या ११ उपऱ्यांना भाजपाने उमेदवारी बहाल केली आहे़ यात काँग्रेसमधून आलेल्या सात, राष्ट्रवादीतून आलेले तीन तर शिवसेनेतून भाजपात प्रवेश केलेल्या एकाचा समावेश आहे़ विशेष म्हणजे यातील काहींचा अजूनही भाजपात जाहीर प्रवेश नाही़ निष्ठावंतांना डावलून उपऱ्यांना तिकिट दिल्याने निष्ठावंतात नाराजी खदखदत आहे़
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरील काही इच्छुक मंडळींनी परंपरागत पक्षाला रामराम ठोकत अन्य पक्षांत प्रवेश केला आहे़ त्यात काँग्रेस व राष्ट्रवादी, शिवसेनेतून भाजपात दाखल झालेल्यांची संख्या अधिक आहे़ या पक्षप्रवेशाचा सर्वाधिक फटका शिवसेनेला बसला आहे़ परिणामी, जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या २० गटांवर शिवसेनेला उमेदवारही मिळू शकला नाही़
जिल्हा परिषदेत ५८ गट असून त्यापैकी ११ ठिकाणी भाजपाने आयारामांना उमेदवारी बहाल केली आहे़ त्यामुळे निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्यांचा हिरमोड झाला आहे़ औसा तालुक्यातील लामजना गटातील काँग्रेसचे महेश पाटील, शिवसेनेच्या कोमल वळुके, राष्ट्रवादीचे बंकट पाटील हे भाजपात दाखल होऊन जिल्हा परिषद निवडणुकीचे तिकीटही मिळविले आहे़
अहमदपूर तालुक्यातील काँग्रेसचे माजी सभापती व विद्यमान सदस्य चंद्रकांत मद्दे यांनी भाजपात प्रवेश करुन शिरुर ताजबंद गटातून उमेदवारी मिळविली आहे़ तसेच चाकूर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या सज्जनकुमार लोणाळे यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले आणि अजनसोंडा (बु) गटातून उमेदवारी मिळविली़ जळकोट तालुक्यातील राष्ट्रवादीचे वांजरवाडा गटाचे सदस्य चंदन पाटील नागरगोजे यांनी अवघ्या काही दिवसांपूर्वी भाजपात दाखल होऊन माळहिप्परगा गटातून उमेदवारी पदरात पाडून घेतली आहे़ तसेच निलंगा तालुक्यातील काँग्रेसच्या डॉ़ संतोष वाघमारे यांनी भाजपात दाखल होत मदनसुरी गटातून उमेदवारी मिळविली आहे़ उदगीर तालुक्यातील काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी नगर परिषद निवडणुकीदरम्यान भाजपात प्रवेश केला आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पत्नी ज्योती राठोड यांना भाजपाकडून निडेबन गटातून उमेदवारी मिळवून घेतली आहे़ काँग्रेसचे माजी पदाधिकारी शिवलिंंग बिरादार यांनीही पक्षाला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला आणि स्रुषा विजया बिरादार यांच्यासाठी भाजपाकडून तोंडार गटातून उमेदवारी मिळविली आहे़ तसेच दैवशाला माने यांनी महिनाभरापूर्वी काँग्रेसला अखेरचा रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला आणि वाढवणा गटातून उमेदवारी दाखल केली आहे़

Web Title: BJP has given 11 candidates for the election!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.