भाजपा सरकार नुसतेच घोषणाबाज !
By Admin | Updated: May 27, 2015 00:39 IST2015-05-27T00:33:31+5:302015-05-27T00:39:51+5:30
उस्मानाबाद : भाजपा सरकार हे नुसतेच घोषणाबाज असल्याचा आरोप करीत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने २६ मे रोजी येथील तहसील कार्यालयासमोर निषेध नोंदविण्यात आला

भाजपा सरकार नुसतेच घोषणाबाज !
उस्मानाबाद : भाजपा सरकार हे नुसतेच घोषणाबाज असल्याचा आरोप करीत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने २६ मे रोजी येथील तहसील कार्यालयासमोर निषेध नोंदविण्यात आला. तसेच राज्यातील सरकार केवळ बोलघेवडे असल्याचे सांगत त्यांनी जनतेचा भ्रमनिरास केल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. धीरज पाटील, उपाध्यक्ष सुधाकर गुंड, प्रदेश उपाध्यक्ष सय्यद इकबाल हुसेन, रूग्ण कल्याण समितीचे अब्दुल लतीफ अ. माजीद, तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे, उमेश राजेनिंबाळकर आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना अॅड. पाटील म्हणाले की, भाजपा सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. परंतु, या सरकारच्या काळात शेतकरी कामगार, उद्योजक, शेतमजूर, युवक यांच्या सामाजिक प्रश्नांना न्याय देण्यात हे शासन कमी पडले आहे. हे सरकार केवळ घोषणाबाज व बोलघेवडे आहे, असे सांगत अशा धोरणामुळेच राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असल्याचा आरोप केला. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून भाजपा सत्तेत आली. परंतु, ही घोषणा प्रत्यक्षात उतरली नाही. काँग्रेसच्या काळात आॅगस्ट २०१३ मध्ये क्रुड आॅईलच्या एका बॅरलची किमत ११५ डॉलर एवढी होती. तेव्हा एक लिटर डिझेलसाठी ५३ तर पट्रोलसाठी ७४ रूपये मोजावे लागत होते. तर भाजपा सरकारच्या काळात (आॅगस्ट २०१४) क्रुड आॅईलसाठी (प्रती बॅरल) १०० रूपये लागत होते. तेव्हा डिझेल ६४ रूपये तर एक लिटर पेट्रोलसाठी ७५ रूपये मोजावे लागत होते. अशीच परिस्थिती इतर कालावधीतही हआहे. एकिकडे क्रुड तेलाचे दर घसरत असताना दुसरीकडे मात्र, पेट्रोल, डिझेलचे तर त्या प्रमाणात कमी केले जात नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, यावेळी अन्य पदाधिकाऱ्यांनीही टिकेची झोड उटविली. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. त्यामुळे जनतेचा विश्वासाला तडा गेल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभय वीर, शैलेश पाटील, जालिंदर केंद्रे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोदावरी केंद्रे, विष्णू चौरे, प्रदेश युवक सचिव अॅड. जावेद काझी, अतिक वाघमारे, बालाजी ठवरे, अमर माने, संजय पवार, भूजंग पाटील, शेख सलमान सत्तार, शेख मेहराज अल्लानुर, बालाजी पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)