‘भाजपा शिवसेनेला बदनाम करीत आहे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:21 IST2017-08-06T00:21:11+5:302017-08-06T00:21:11+5:30

सेनेचे आमदार, नगरसेवक जागेवरच असून भाजपातील प्रवेशाबद्दल वावड्या उठवून सेनेला बदनाम करण्याचे काम भाजपच करीत असल्याची टीका शिवसेना नेते पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले़ चहाच्या माध्यमातून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पक्ष फोडण्याचे प्रयत्न करीत आहेत़ आगामी विधानसभा निवडणुकीत दानवेंना त्यांच्याच मतदारसंघात पाणी पाजा असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले़

'BJP is defaming Shiv Sena' | ‘भाजपा शिवसेनेला बदनाम करीत आहे’

‘भाजपा शिवसेनेला बदनाम करीत आहे’

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : सेनेचे आमदार, नगरसेवक जागेवरच असून भाजपातील प्रवेशाबद्दल वावड्या उठवून सेनेला बदनाम करण्याचे काम भाजपच करीत असल्याची टीका शिवसेना नेते पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले़ चहाच्या माध्यमातून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पक्ष फोडण्याचे प्रयत्न करीत आहेत़ आगामी विधानसभा निवडणुकीत दानवेंना त्यांच्याच मतदारसंघात पाणी पाजा असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले़
आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेचे तीन मंत्री शनिवारी नांदेडमध्ये दाखल झाले़ त्यात पर्यावरणमंत्री रामदास कदम, परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांचा समावेश होता़ या मंत्र्यांनी तीन मेळावे आणि नगरसेवकांच्या बैठकीत शिवसैनिकांना आगामी निवडणुकीत महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले़ शहरातील महात्मा फुले मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यात पर्यावरणमंत्री कदम यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दानवे हे चहा पिण्यास जाऊन फोडाफोडीचे राजकारण करीत आहेत़ त्यांना धडा शिकवण्यासाठी आता त्यांच्याच मतदार संघात त्यांना पाणी पाजण्याची वेळ आली असल्याचे सांगितले़ सेनेवर जातीयवादी पक्ष असल्याची टीका केली जात आहे़ मात्र या शिवसेनेने १९९६ मध्ये सत्ता असताना साबेर शेख यांना मंत्री केले़ नांदेडचे ते पालकमंत्री असल्याचीही आठवण त्यांनी करून दिली़ काँग्रेसची महापालिकेवर सत्ता आहे मात्र नांदेडचा गुरू-ता-गद्दी कालावधीत झालेला विकास कुठे गेला असा सवालही त्यांनी उपस्थित केला़ २ हजार कोटी आले असतानाही आज गोदावरी अशुध्दच आहे़ शहरात ठिकठिकाणी कचºयाचे ढिगारे आहेत़ हाच विकास आहे का असा सवालही त्यांनी केला़ परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी काँग्रेसच्या ताब्यातून सत्ता हिसकावयाची आहे़ विरोधकांसोबत लढताना सेनेला घरभेद्यांशी लढावे लागणार असल्याचेही ते म्हणाले़ मराठवाड्यात बहुजन समाजाचे नेतृत्व तयार करण्याचे काम शिवसेनेने केले असल्याचेही त्यांनी सांगितले़ पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज पक्षाला ताकद देण्याची गरज असल्याचे सांगताना शिवसेना अभेद्य असल्याचेही ते म्हणाले़ जिल्ह्यात तरूणांची ताकद उभी राहत आहे़ पक्षावर निष्ठा ठेवून तसेच भगव्या झेंड्यावर विश्वास ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले़ सेनेची सत्ता आणण्यासाठी आपण महिनाभर नांदेडात तळ ठोकू असेही त्यांनी स्पष्ट केले़ प्रास्ताविकात आ़ हेमंत पाटील यांनी सध्या काही बांडगूळे उड्या मारत आहेत़ त्यांना त्यांची जागा दाखवावी लागणार आहे़ आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाचे सर्व मंत्री, आमदार नांदेडात येणार असून आवश्यक ती सर्व मदत केली जाणार असल्याचेही आ़ पाटील यांनी सांगितले़ यावेळी शिवसेनेचे नूतन संपर्क प्रमुख आनंद जाधव, आ़ सुभाष साबणे, प्रकाश कौडगे, धोंडू पाटील, जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख, प्रकाश मारावार, बालाजी कल्याणकर, विनय सगर, अशोक उमरेकर, विनय गुर्रम, बाळासाहेब देशमुख आदींची उपस्थिती होती़
दरम्यान, नांदेड दक्षिणच्या झालेल्या मेळाव्यात उपरोक्त नेत्यांनी मार्गदर्शन केले़ सिडको येथेही मेळावा घेण्यात आला़ तर नगरसेवकांचीही एक बैठक घेवून मार्गदर्शन करण्यात आले़

Web Title: 'BJP is defaming Shiv Sena'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.