भाजप देशासाठी घातक, काँग्रेसला मोठे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:04 IST2021-07-31T04:04:26+5:302021-07-31T04:04:26+5:30

गांधी भवनात मेळावा : बाळासाहेब थोरात यांचे आवाहन औरंगाबाद : भाजप देशासाठी घातक असून काँग्रेसला मोठे करा, असे आवाहन ...

BJP is dangerous for the country, make Congress big | भाजप देशासाठी घातक, काँग्रेसला मोठे करा

भाजप देशासाठी घातक, काँग्रेसला मोठे करा

गांधी भवनात मेळावा : बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

औरंगाबाद : भाजप देशासाठी घातक असून काँग्रेसला मोठे करा, असे आवाहन आज येथे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

ते गांधी भवनात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. ते म्हणाले की, सरकार आले आणि कोरोना सुरू झाला. त्यामुळे संपर्क कमी झाला. माझेही दौरे कमी झाले. आपण महाविकास आघाडीचे घटक आहोत. ४४ जागा आपल्या निवडून आल्या.

भाजपचे सरकार आले असते, तर ते देशाच्या व लोकशाहीच्या दृष्टीने हिताचे ठरले नसते. राज्यघटनासुद्धा बदलणारे हे लोक आहेत, असा आरोप त्यांनी केला.

कोरोना संपलेला नाही. तुम्ही बिनधास्त राहू नका, असे सांगत ते म्हणाले की, संकटांमागून संकटे येत आहेत. अशावेळी कॉंग्रेस काम करीत आहे. आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान बोलायला तयार नाहीत. पेट्रोलचे भाव एक रुपयाने वाढल्यावर आंदोलन करणारे भाजपचे कार्यकर्ते आता कुठे लपून बसले, माहीत नाही. देशाला, गरिबांना कॉंग्रेसशिवाय पर्याय नाही. औरंगाबादला पुरोगामी कार्यकर्ते अधिक आहेत. त्या कार्यकर्त्यांना जोडा. पक्षाच्या प्रत्येक सेलची कार्यकारिणी प्रत्येक वाॅर्डात स्थापन करा. अमित देशमुख औरंगाबादेत आणखी लक्ष घालतील. कोरोना संपू द्या. आपण मोठा मेळावा घेऊ. कॉंग्रेसलाच पुन्हा सोन्याचे दिवस आणू या.

यावेळी मोहसीन समद यांनी गांधी भवनाच्या ग्रंथालयासाठी ५१ पुस्तके भेट दिली. ‘डीकेएमएम’च्या पंधरा डॉक्टरांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अरुण शिरसाट यांनी सूत्रसंचालन केले. सरोज मसलगे यांनी आभार मानले.

जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे, माजी आमदार एम. एम. शेख, सीमा थोरात, इब्राहिम पठाण, चंद्रभान पारखे, सय्यद‌ अक्रम, हमद चाऊस, मोहित जाधव, मुदस्सर अन्सारी, मुजफ्फर खान पठाण, भाऊसाहेब जगताप, अनिल मालोदे आदींची मंचावर उपस्थिती होती. डॉ. जॉन जेम्स अंबिलढगे यांना वैद्यकीय सेलच्या नियुक्तीचे पत्र यावेळी देण्यात आले.

Web Title: BJP is dangerous for the country, make Congress big