निवडणुकीच्या तोंडावर भाजपाचा काँग्रेस, राष्ट्रवादी अन् शिवसेनेला हादरा
By Admin | Updated: March 3, 2017 01:31 IST2017-03-03T01:29:00+5:302017-03-03T01:31:15+5:30
लातूर : बसस्थानकामागील अंबिका देवी मंदिराच्या सभा मंडपाच्या कामाचा बेकायदेशीर ठराव केल्याप्रकरणी लातूर मनपाच्या तत्कालीन स्थायी समितीच्या १६ सदस्यांना राज्य शासनाने नोटिसा बजावल्या आहेत़

निवडणुकीच्या तोंडावर भाजपाचा काँग्रेस, राष्ट्रवादी अन् शिवसेनेला हादरा
लातूर : बसस्थानकामागील अंबिका देवी मंदिराच्या सभा मंडपाच्या कामाचा बेकायदेशीर ठराव केल्याप्रकरणी लातूर मनपाच्या तत्कालीन स्थायी समितीच्या १६ सदस्यांना राज्य शासनाने नोटिसा बजावल्या आहेत़ ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपा शासनाने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि आरपीआयच्या तत्कालीन स्थायीतील १६ नगरसेवकांना हादरा दिला़ राज्य शासनाकडून नोटिसा अद्याप संबंधित नगरसेवकांना मिळाल्या नसल्या तरी अपात्रतेचे संकट त्यांच्यावर आहे़
बसस्थानकाच्या पाठीमागील अंबिका देवी मंदिरासमोर कायम स्वरूपी सभामंडप उभारण्यासाठी स्थायी समितीचे तत्कालीन सभापती पप्पू देशमुख व समितीतील अन्य १५ सदस्यांनी ठराव घेवून सहमती दिली़ याबाबत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस सुधीर धुत्तेकर यांनी स्थायी समितीने अतिक्रमणाला मदत केली असल्याची तक्रार राज्य शासनाकडे केली़ या तक्रारीची गंभीर दखल घेऊन शासनाने मनपा आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते़ आयुक्तांचा अहवाल गेल्यानंतर नगर विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर यांनी तत्कालीन स्थायी समितीचे सभापती पप्पू देशमुख यांच्यासह अन्य १५ सदस्यांना महानगरपालिका अधिनियम कलम १० (ड) प्रमाणे नोटिसा बजावल्या आहेत़ आपले नगरसेवक पद रद्द करून निवडणुकीला ६ वर्षे अपात्र का करू नये, अशा नोटिसा पाठविल्या आहेत़ ७ दिवसात खुलासा करण्याचे निर्देशही या नोटिसीत देण्यात आले आहेत़ यामुळे तत्कालीन स्थायी समितीतील सभापती पप्पू देशमुख, रविशंकर जाधव, रविकुमार जाधव, डॉ़ विजय अजणीकर, कविता वाडेकर, सुरेखा इगे, श्रीमती मिस्त्री, उषाताई कांबळे, महादेव बरूरे, राष्ट्रवादीचे राजा मनियार, इर्शाद तांबोळी, शैलेश स्वामी, आशा स्वामी, रिपाइंचे चंद्रकांत चिकटे आदींचे सदस्यत्व धोक्यात आले आहे़