भाजपा इच्छुकांचा सर्वच मतदारसंघावर दावा
By Admin | Updated: August 3, 2014 01:13 IST2014-08-03T00:29:19+5:302014-08-03T01:13:58+5:30
नांदेड : भाजपाकडून शनिवारी इच्छुकांची माहिती गोळा करण्यासाठी आलेल्या पक्षनिरीक्षकांसमोर निष्ठावंतांसह नवख्यांनी शक्तिप्रदर्शन करीत सर्व मतदारसंघावर दावा केला़

भाजपा इच्छुकांचा सर्वच मतदारसंघावर दावा
नांदेड : भाजपाकडून शनिवारी इच्छुकांची माहिती गोळा करण्यासाठी आलेल्या पक्षनिरीक्षकांसमोर निष्ठावंतांसह नवख्यांनी शक्तिप्रदर्शन करीत सर्व मतदारसंघावर दावा केला़ आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या व आयात केलेल्या उमेदवारांवर आळा घालण्याची मागणी निष्ठावंतांनी केली़
दोनच दिवसांपूर्वी नांदेडात येवून गेलेल्या प्रदेश सरचिटणीसांनी कार्यकर्त्यांनी सर्वच्या सर्व नऊ जागांसाठी तयार राहण्याचे सुतोवाच केले होते़ त्याचवेळी निष्ठावंतांनी दुसऱ्या पक्षातून आलेल्या संधिसाधूंच्या बाबतीत आक्षेप घेतले होते़ त्यानंतर शनिवारी अमरावतीचे खा़ रामदास तडस व माजी महापौर निवेदिता चौधरी हे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी नांदेडात आले होते़ त्यांच्यासमोरही इच्छुकांनी दिल्लीत सत्ता आल्याचे पाहून हाती कमळ धरलेल्यांना संधी देणार की, निष्ठावंतांना असा प्रश्न उपस्थित केला़ सत्ता नसताना एवढे वर्षे पक्षाचे काम केलेल्या निष्ठावंतांना लोकसभेप्रमाणे विधानसभेमध्येही डावलण्यात येवू नये अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली़
यावेळी सर्व नऊ मतदारसंघावर दावा करीत इच्छुकांनी आपल्या समर्थकांसह शक्तिप्रदर्शन केले़ यावेळी किनवटमधून सुधाकर भोयर, धरमसिंह राठोड, किसन मिराशे, बिभिषण राठोड, अॅड़जायभाये, हदगाव-पंडितराव देशमुख, गजानन तुप्तेवार, भोकर-राम चौधरी, प्रवीण गायकवाड, नायगाव- श्रावण पाटील भिलवंडे, राजेश पवार, गंगाराम ठक्करवाड, लोहा- गीते महाराज, केरु सावकार बिडवई, बाबूराव कांगणे, मुक्तेश्वर धोंडगे, मुखेड- गोविंद राठोड, किशन राठोड, राम पाटील रातोळीकर (यामध्ये इच्छुकांची नावे वाढण्याची शक्यता आहे) यांच्यासह अनेकांनी शक्तिप्रदर्शन केले़ त्याचबरोबर नांदेड उत्तर आणि दक्षिणवरही इच्छुकांनी दावा केला़ सर्व मतदारसंघावर भाजपाच्या इच्छुकांनी केलेल्या दाव्यामुळे सेनेच्या गोटात मात्र अस्वस्थता आहे़
यावेळी भाजपाचे अॅड़ प्रवीण साले, डॉ़ अजित गोपछडे, चैतन्यबापू देशमुख, देवीदास राठोड, व्यंकटेश साठे, गोविंद यादव यांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)