भाजपही स्वबळाच्या तयारीत
By Admin | Updated: March 31, 2015 00:41 IST2015-03-31T00:26:51+5:302015-03-31T00:41:58+5:30
औरंगाबाद : गुलमंडी, राजाबाजारसह अनेक प्रतिष्ठेच्या वॉर्डांमुळे सेना- भाजपच्या युतीचे घोडे अडले आहे. जर युती जमलीच नाही तर मनपाचे सर्वच्या सर्व ११३ वॉर्ड लढविण्याचा इरादा भाजपने केला आहे.

भाजपही स्वबळाच्या तयारीत
औरंगाबाद : गुलमंडी, राजाबाजारसह अनेक प्रतिष्ठेच्या वॉर्डांमुळे सेना- भाजपच्या युतीचे घोडे अडले आहे. जर युती जमलीच नाही तर मनपाचे सर्वच्या सर्व ११३ वॉर्ड लढविण्याचा इरादा भाजपने केला आहे. त्यासाठी मंगळवारपासून सर्व वॉर्डांच्या मुलाखतीचा कार्यक्रम भाजपने जाहीर केला आहे. सेनेनेही ‘युती’ची वाट न पाहता दोन दिवसांपूर्वी सर्व हिंदूबहुल वॉर्डांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेऊन ठेवल्या होत्या. भाजपनेही संपूर्ण वॉर्डांचा मुलाखत कार्यक्रम घोषित करून एकप्रकारे सेनेला शहच देण्याचा प्रयत्न केला आहे.
औरंगाबाद महानगरपालिकेच्या अनेक निवडणुका सेना- भाजपने ‘युती’त लढलेल्या आहेत. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांचे संबंध चांगलेच बिघडले. तेथे ‘युती’ दुभंगली.
मात्र, आता मनपाच्या निवडणुका एकत्रपणे लढवाव्यात, असा सेना- भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा सूर दिसून येत आहे. आठ दिवसांपूर्वी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ‘युती’ होणार असे जाहीर केले होते. सोमवारी दानवे यांनी अचानक ‘यू टर्न’ घेतला. सेनेचा बालेकिल्ला असलेला गुलमंडी वॉर्ड भाजप सेनेला कदापि सोडणार नाही, असे सांगत त्यांनी एकप्रकारे युती होणार नसल्याचे संकेतच दिले.
दरम्यान, अनेक महत्त्वपूर्ण वॉर्डांच्या वाटपावरून युतीचे घोडे अडलेले आहे. दोन्ही पक्ष आपापला हट्ट सोडायला तयार नाहीत. त्यातच युतीची बोलणी सुरू असतानाच शिवसेनेने दोन दिवसांपूर्वी ११३ पैकी ९० वॉर्डांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यात ‘युती’त आतापर्यंत भाजपच्या वाट्याला असलेल्या वॉर्डांसाठीही सेनेने मुलाखती घेऊन टाकल्या.
ही बाब भाजपला पचनी पडलेली दिसत नाही. त्यामुळेच भाजपनेही सेनेला शह देण्यासाठी ‘शत- प्रतिशत’ तयारी सुरू केली आहे.
सेनेने तरी ९० वॉर्डांसाठी मुलाखती घेतल्या होत्या. भाजपने त्यापुढे जाऊन संपूर्ण ११३ वॉर्डांसाठी मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ३१ मार्च आणि १ एप्रिल अशा दोन दिवस या मुलाखती होणार आहेत.