काँग्रेसविरुद्ध भाजप मैदानात
By Admin | Updated: July 13, 2017 00:49 IST2017-07-13T00:49:02+5:302017-07-13T00:49:31+5:30
जालना : शहरातील स्वच्छतेसह विविध प्रश्न सोडविण्यात नगर पालिका असमर्थ ठरल्याचा आरोप करीत भाजपने बुधवारी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले.

काँग्रेसविरुद्ध भाजप मैदानात
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील स्वच्छतेसह विविध प्रश्न सोडविण्यात नगर पालिका असमर्थ ठरल्याचा आरोप करीत भाजपने बुधवारी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. शहरातील जटिल बनलेले प्रश्न सोडविण्यासाठी पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक भास्कर दानवे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील मामा चौकात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, सरचिटणीस देविदास देशमुख, नगरसेवक ज्ञानेश्वर ढोबळे, शशिकांत घुगे, माजी आ. अरविंद चव्हाण, शहराध्यक्ष सिद्धीविनायक मुळे, आयेशा खान यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.
जालना शहरातील पथदिवे बंद असून, नियमितपणे कचरा उचलला जात नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नाल्यांची नियमित सफाई आणि पाणीपुरवठा होत नाही. घंटागाड्यांचाही वापर नियमित केला जात नाही. सफाई कर्मचाऱ्यांची संख्या कमी असून, त्यामुळे स्वच्छतेच्या कामावर विपरित परिणाम होत आहे. शहरात प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत असला तरी त्यावर प्रतिबंध घालण्यात नगर पालिका व प्रशासन अपयशी ठरत आहे. अवैधरीत्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री होत असल्याने कचरा नष्ट होत नाही. यासह अन्य समस्या सोडविण्यात जालना नगर पालिका असमर्थ ठरली असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
यासंदर्भात बुधवारी भाजपाच्या वतीने दिलेल्या निवेदनात विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. विशेषत्वाने नगर परिषदेच्या हद्दीत असलेल्या नद्या व नाले स्वच्छ करून ते अतिक्रमणमुक्त करावेत, पालिकेच्या मालकीच्या जागांवर उद्याने विकसित करावीत, नगर परिषदेमध्ये महिलांसाठी स्वतंत्र शौचालय तयार करावे, शहरात सर्रासपणे सुरू असलेली अवैध व उघड्यावरील मांस विक्री तात्काळ थांबवावी यासाठी जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी लक्ष घालावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, उपाध्यक्ष भास्कर दानवे, देविदास देशमुख, सिध्दीविनायक मुळे, बाबूराव भवर, बद्री पठाडे, धनराज काबलिये, विशाल बनकर, नरेंद्र दायमा, सुनील पवार, समर्पण विजयसेनानी, शिवराज भुरेवाल, हरेष भुरेवाल, शाम जाधव, शेख अब्दुल्ला, संतोष खंडेलवाल, अनिल घोलप, नगरसेवक ज्ञानेश्वर ढोबळे, चंपालाल भगत, अशोक पांगारकर, रोहित नलावडे, चंद्रकांत मिसाळ, चेतन देसरडा आदी कार्यकर्त्यांच्या सह्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.