चाव्या,शिक्के बीडीओंकडे
By Admin | Updated: July 3, 2014 00:23 IST2014-07-03T00:05:20+5:302014-07-03T00:23:14+5:30
नांदेड :वेतनातील तफावत दूर करून पाचव्या वेतन आयोगाप्रमाणे सहाव्या वेतन आयोगातही वेतनश्रेणी देण्यात यावी या मागणीसाठी राज्य ग्रामसेवक युनियनने आंदोलन सुरू केले आहे़

चाव्या,शिक्के बीडीओंकडे
नांदेड : ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांच्या वेतनातील तफावत दूर करून पाचव्या वेतन आयोगाप्रमाणे सहाव्या वेतन आयोगातही वेतनश्रेणी देण्यात यावी या मागणीसाठी राज्य ग्रामसेवक युनियनने आंदोलन सुरू केले आहे़ या आंदोलनांतर्गत बुधवारी जिल्ह्यातील ६०० हून अधिक ग्रामपंचायतीच्या चाव्या आणि शिक्के बीडीओंकडे जमा करण्यात आले आहेत़
ग्रामसेवक युनियनने या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे़ या आंदोलनांतर्गत ३० जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर ग्रामसेवकांनी मोर्चा काढला़ तर १ जुलै रोजी दैनंदिन काम केले़ तर बुधवारी ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांनी आपल्याकडील ग्रामपंचायतींच्या चाव्या व शिक्के बीडीओंकडे जमा केले़ राज्यशसनाच्या १३८ योजनेचे काम ग्रामसेवक करत आहेत़ अनेक योजनांमध्ये देशात महाराष्ट्र सतत प्रथम क्रमांकावर राहिले आहे़ असे असताना ग्रामसेवक संवर्गाच्या न्याय मागण्याकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला आहे़ शासनाने हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन संघटनेला वारंवार दिले होते़ मात्र ते पूर्ण केले नाही़ त्यामुळे युनियनने आंदोलन छेडले आहे़
ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांची वेतनश्रेणी एकच असल्यामुळे कालबध्द पदोन्नततीमध्ये आर्थिक लाभ मिळत नसल्याने ग्रामसेवक संवर्गात तीव्र नाराजगी पसरली आहे़ ग्रामसेवक युनियनने पुकारलेल्या आंदोलनांतर्गत २ जुलै रोजी ग्रामपंचायतीच्या चाव्या, शिक्के गटविकास अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आल्या़ आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यांसाठी मुंबई येथे आझाद मैदानावर ग्रामसेवक विभागनिहाय धरणे आंदोलन करणार आहेत़
त्यात औरंगाबाद विभागातील ग्रामसेवक १४ व १५ जुलै रोजी धरणे आंदोलन करणार असल्याचे संघटनेचे विभागीय अध्यक्ष एऩ डी़ कदम यांनी सांगितले़ १६ जुलैपासून बेमूदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे़ ग्रामसेवकांचे हे आंदोलन यशस्वी करण्यात येईल अशी माहिती संघटनेचे सचिव पी़जे़ नागेश्वर, कोषाध्यक्ष बी़डी़ बुच्चे, मानद अध्यक्ष श्यामराव मुत्यालवार, कार्याध्यक्ष आनंद शेळके, उपाध्यक्ष जे़डी़ वनसागरे, सय्यद नजीर, स्वप्नाली चव्हाण, यु़बी़ नाईक आदींनी सांगितले़ (प्रतिनिधी)
आंदोलनाच्या तीव्रतेबाबत प्रशासन अनभिज्ञच
जिल्ह्यात ग्रामसेवक युनियनने आंदोलन केले असले तरी या आंदोलनाचा विशेष परिणाम जाणवला नसल्याचे जि़प़च्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यु़ ए़ कोमवाड यांनी सांगितले़
धर्माबाद तालुक्यातील काही ग्रामसेवकांनी चाव्या दिल्या असल्याचे सांगताना इतर तालुक्यातील आंदोलनाच्या परिस्थितीबाबत माहिती घेतली जात असल्याचे ते म्हणाले़
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कंत्राटी ग्रामसेवक, विस्तार अधिकारी तसेच अन्य अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतीचा पदभार सोपविला जाणार आहे़
याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनीही सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले़
राज्य ग्रामसेवक संघ संपात नाही
जिल्ह्यात राज्य ग्रामसेवक युनियनने पुकारलेल्या आंदोलनात राज्य ग्रामसेवक संघ सहभागी नसल्याचे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी कळवले आहे़ ग्रामसेवक संघाचे सर्व सभासद आपआपल्या सज्जावर कार्यरत राहणार असल्याचे अध्यक्ष संजय मिरजकर, कार्याध्यक्ष आऱबी़ साळवे, सरचिटणीस डी़एस़ कुरूंदे यांनी सांगितले़