पिसाळलेल्या श्वानाचा आठ जणांना चावा
By Admin | Updated: August 24, 2014 00:39 IST2014-08-24T00:39:13+5:302014-08-24T00:39:13+5:30
मुखेड : तालुक्यातील वर्ताळा येथील आठ व्यक्तींना शुक्रवारी सकाळी पिसाळलेल्या श्वानाने पाठलाग करुन चावा घेतला.

पिसाळलेल्या श्वानाचा आठ जणांना चावा
मुखेड : तालुक्यातील वर्ताळा येथील आठ व्यक्तींना शुक्रवारी सकाळी पिसाळलेल्या श्वानाने पाठलाग करुन चावा घेतला. यात उघड्यावर शौचास जाणाऱ्यांचा समावेश आहे. सर्वांना उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन नांदेडला हलवण्यात आले आहे.
शुक्रवारी पहाटे ग्रामस्थ आपल्या कामात असताना गावात एकच धांदल उडाली. पिसाळलेला कुत्रा रस्त्यावरील दिसेल त्याच्यावर धावून चावा घ्यायला लागला. पहाटे उघड्यावर शौचास बसणाऱ्यांंना या श्वानाने सोडले नाही. अर्ध्या तासात पिसाळलेल्या श्वानाने गणपत बाजीराव डावकरे (वय ३५), विष्णु गंगाधर आगलावे (वय २०), मारोती देशमुख (वय ६० वर्षे), शादुल सय्यद (वय ३५), लहू जायभाये (वय २५), कल्याणे व कांबळे यांना चावा घेवून जखमी केले.
जखमींना दादाराव आगलावे, भाऊसाहेब आगलावे यांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमीवर वैद्यकीय अधिकारी आंगद जाधव यांनी प्राथमिक उपचार करुन लस उपलब्ध नसल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविले. (वार्ताहर)