सा. बां.तर्फे कोट्यवधींची कामे
By Admin | Updated: December 22, 2014 00:08 IST2014-12-22T00:08:32+5:302014-12-22T00:08:32+5:30
औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाने कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेतला असून, यासंदर्भात निविदाही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

सा. बां.तर्फे कोट्यवधींची कामे
औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाने कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेतला असून, यासंदर्भात निविदाही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. सुमारे १३ कोटी रुपयांची ही कामे करण्यात येणार आहेत.
औरंगाबाद-अजिंठा-बऱ्हाणपूर या रस्त्याच्या दोन निविदा काढण्यात आल्या आहेत. ३ कोटी ६ लाख आणि २ कोटी ६३ लाख रुपये या रस्त्यांच्या डांबरीकरणावर खर्च करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे देवगाव ते गंगापूर या रस्त्याच्या कामावरही १ कोटी ४२ लाख रुपये, औरंगाबाद तालुक्यातील पळशी ते अंजनडोह या अंतर्गत रस्त्याची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. या कामावर २ कोटी १९ लाख रुपये खर्च होतील. मकबरा ते औरंगाबाद लेण्यापर्यंतच्या रस्त्याची अवस्थाही मागील काही वर्षांपासून अत्यंत दयनीय झाली आहे. यापूर्वीही सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामासाठी निविदा काढली होती. मात्र, कंत्राटदारांनी प्रतिसाद न दिल्याने काम तसेच रखडले होते.
या कामासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, १ कोटी ९० लाख रुपये या कामावर खर्च होतील. औराळा ते लक्ष्मीदेवी संस्थानपर्यंतच्या रस्त्याची डागडुजी करण्यात येणार आहे. या कामावर ३५ लाख २१ हजार रुपये खर्च होणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन कामांचा डिसेंबर अखेर धडाका लावला आहे. मात्र, मागील अर्धवट कामांचा या विभागाला विसर पडला आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षात ज्या कंत्राटदारांनी कोट्यवधी रुपयांची कामे केली आहेत, त्यांना आजपर्यंत बिले देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे नवीन कामे घेण्यास कंत्राटदारही इच्छुक नाहीत. कामे केल्यानंतरही दोन वर्षे बिले निघत नसतील तर कशासाठी कामे करायची, असा मुद्या कंत्राटदारांनी उपस्थित केला आहे.
वर्षभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागात एका अधिकाऱ्याच्या मनमानीला कंत्राटदार लॉबी वैतागली होती. अधिकारी सतत सुट्टीवरच असतात. त्यामुळे भेटावे तरी कोणाला, असा प्रश्न कंत्राटदारांना पडला आहे.