सलीम अली सरोवरातील जैवविविधता अबाधित

By Admin | Updated: July 10, 2014 01:15 IST2014-07-10T00:53:24+5:302014-07-10T01:15:08+5:30

औरंगाबाद : महानगरपालिकेने ऐतिहासिक सलीम अली सरोवराचे नुकतेच सुशोभीकरण केले.

Biodiversity in the Salim Ali lake prevailed | सलीम अली सरोवरातील जैवविविधता अबाधित

सलीम अली सरोवरातील जैवविविधता अबाधित

औरंगाबाद : महानगरपालिकेने ऐतिहासिक सलीम अली सरोवराचे नुकतेच सुशोभीकरण केले. त्यामुळे या तलावातील जैवविविधतेला धोका निर्माण झाला नसल्याचे शपथपत्र महानगरपालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी नुकतेच औरंगाबाद खंडपीठात सादर केले आहे.
सलीम अली सरोवरात विविध प्रकारचे जलचर तसेच तलाव परिसरात असलेल्या विविध प्रकारच्या वनस्पती आणि झाडांमुळे तेथे मोठ्या प्रमाणात पक्षी आणि अन्य जीव आहेत. सरोवराच्या सुशोभीकरणासाठी सरोवर परिसरात बांधकामे करण्यात आली. त्यामुळे तेथील जैवविविधता धोक्यात आल्याचे सांगून सलीम अली सरोवरसंवर्धन समितीचे समन्वयक अरविंद पुजारी यांनी अ‍ॅड. महेश भारस्वाडकर यांच्यामार्फत खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती.
याचिकेच्या सुनावणीवर न्यायालयाच्या आदेशाने महानगरपालिकेने जैवविविधता संरक्षण व संवर्धन समिती स्थापन केली. सरोवरातील जैवविविधतेला बाधा येईल, असे कोणतेही काम तेथे केले जाणार नाही, अशी ग्वाही मनपातर्फे देण्यात आली होती. मनपाने सरोवराचे नुकतेचे सुशोभीकरण व प्रवेशद्वाराचे उद्घाटन केले.
याचिका पुन्हा सुनावणीसाठी आली असता अ‍ॅड. भारस्वाडकर यांनी मनपाच्या कामाला आक्षेप घेतला. न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित असताना उद्यानाचे काम सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मनपाने उद्यानाची वेळ सकाळी १० ते ६ असल्याचे आयुक्तांनी सादर केलेल्या शपथपत्रात नमूद केले. तेथील जैवविविधतेला धोका नसल्याचे शपथपत्रात स्पष्ट करून त्यांनी सरोवरावर पक्षी निरीक्षक केंद्र, अंतर्गत रस्ते व प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण करण्यात आल्याचे सांगितले. हे करण्यापूर्वी मनपाने जैवविविधता संरक्षण व संवर्धन समितीची परवानगी घेतली होती.
खंडपीठाच्या सूचनांचे पालन करण्यात आले. सरोवर परिसरात तीन सुरक्षारक्षक नेमले असून पक्षी सकाळी निघून जातात आणि सायंकाळी ६ नंतर परत येतात तर नागरिक सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तेथे असतात. या प्रकरणात महानगरपालिकेच्या वतीने अ‍ॅड. राजेंद्र देशमुख यांनी काम पाहिले.

Web Title: Biodiversity in the Salim Ali lake prevailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.