मनपात आजपासून बायोमेट्रिक हजेरी
By Admin | Updated: August 4, 2015 00:38 IST2015-08-04T00:38:40+5:302015-08-04T00:38:40+5:30
औरंगाबाद : मनपात लेटलतीफ कर्मचाऱ्यांना वेसण घालण्याकरिता उद्यापासून बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी नोंदविणे सक्तीचे करण्यात आले आहे.

मनपात आजपासून बायोमेट्रिक हजेरी
औरंगाबाद : मनपात लेटलतीफ कर्मचाऱ्यांना वेसण घालण्याकरिता उद्यापासून बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी नोंदविणे सक्तीचे करण्यात आले आहे. मनपा आयुक्तांनी सोमवारी सर्व विभागप्रमुखांना तशा लेखी सूचना दिल्या असून, रजिस्टरमध्ये कुणीही हजेरी नोंदवू नये याकरिता संबंधित विभागांमधील हजेरी रजिस्टरही हटविण्यास सांगण्यात आले आहे.
महापौर त्र्यंबक तुपे आणि मनपा आयुक्त पी. एम. महाजन यांनी आज सकाळी १० वाजता मुख्य इमारतीत पाहणी केली. यावेळी अनेक कर्मचारी कार्यालयात पोहोचले नसल्याचे आढळून आले.
त्यामुळे आयुक्तांनी मनपाची दोन्ही प्रवेशद्वारे बंद करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सर्व विभागातील हजेरी रजिस्टर ताब्यात घेतले, तर १० वाजेच्या ठोक्याला कार्यालयात आलेल्या कर्मचाऱ्यांनाही रजिस्टरऐवजी बायोमेट्रिक मशीनवरच हजेरी नोंदविण्याचे आदेश दिले. त्यामुळे मनपात आज पहिल्यांदाच बायोमेट्रिक मशीनसमोर हजेरी नोंदविण्यासाठी कर्मचाऱ्यांची रांग लागली. यानंतर लगेचच आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना बोलावून उद्यापासून मनपात बायोमेट्रिक पद्धतीनेच हजेरी नोंदविली जाईल, कुणीही रजिस्टरमध्ये हजेरी नोंदवून घेऊ नये, असे आदेश त्यांनी दिले. सर्व कर्मचाऱ्यांचे हजेरीपट तातडीने ताब्यात घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
महापौर आणि मनपा आयुक्त यांनी सोमवारी संयुक्त पाहणी केली. या पाहणीत मनपाची मुख्य प्रशासकीय इमारत आणि टप्पा ३ या दोन इमारतीत सुमारे साडेतीनशे कर्मचारी गैरहजर आढळले.
४मात्र, ही शेवटची संधी समजून सर्वांना सूट देण्याचे आदेश महापौरांनी दिले; परंतु आता उद्यापासून बायोमेट्रिक मशीनवर हजेरी घेण्यात येणार असून त्याच्या नोंदी रोज लेखा विभागाकडे सादर करण्यात येणार आहेत. त्यामुळे यापुढे गैरहजर आढळणाऱ्यांचे वेतन कपात होणार आहे, असे महापौरांनी सांगितले.