बिलोलीत ‘हाफ डे’ शाळा
By Admin | Updated: July 6, 2014 00:13 IST2014-07-06T00:05:11+5:302014-07-06T00:13:43+5:30
राजेश गंगमवार, बिलोली सद्य:स्थितीत उन्हाळ्याप्रमाणे तापमान वाढले असून विद्यार्थ्यांना वर्गात थांबणेदेखील अवघड झाले आहे.

बिलोलीत ‘हाफ डे’ शाळा
राजेश गंगमवार, बिलोली
सद्य:स्थितीत उन्हाळ्याप्रमाणे तापमान वाढले असून विद्यार्थ्यांना वर्गात थांबणेदेखील अवघड झाले आहे. परिणामी बिलोली तालुक्यातील खाजगी शाळांनी मार्चप्रमाणे ‘हाफ डे’ शाळांचा प्रयोग सुरु केला आहे. पावसाने हुलकावणी दिल्याने सर्वच स्तरात फटका बसला असून शेतकरी देखील हैराण झाला आहेत. दरम्यान, खाजगी शाळा संस्थेमार्फत निर्णय घेत असून जिल्हा परिषदांच्या शाळा मात्र वरिष्ठांकडे पाहत आहेत.
जुलैचा पहिला आठवडा संपत आला पण पावसाची अद्याप चिन्हे नाहीत. उलट उन्हाळ्याप्रमाणे तापमान वाढले आहे. दिवस-रात्र वारे सुटत असून आकाशातही ढगाळ वातावरण नाही. वाढत्या तापमानामुळे अद्यापही उन्हाळ्याप्रमाणे घराघरात वॉटर कुलर दिसून येत आहे. घरातही थांबणे अवघड होऊन बसले आहे. इकडे शाळांमध्येदेखील हिच स्थिती असून ५० ते ६० विद्यार्थी असलेल्या वर्गावर्गात उकाड्याने विद्यार्थी वैतागले आहेत. जूनअखेर प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जुलैपासून शिकवणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, शिक्षक मंडळी शिकवणी करीत असले तरी उकाडा व गारपिटीमुळे विद्यार्थ्यांचे लक्ष लागत नाही. परिणामी विद्यार्थी हजेरीवरदेखील परिणाम झाला आहे. यापूर्वी पावसाळा लांबला की उन्हाळी सुट्या वाढत होत्या. पण जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने एकच दिवस हजेरी लावली. परिणामी सुट्या वाढवण्याचा प्रश्नच पुढे आला नाही. मात्र मागच्या वीस दिवसांत एकही थेंब पाऊस झाला नाही. उलट उन्हाळ्याप्रमाणे उकाड्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. परिणामी शाळांवरदेखील परिणाम झाला. यासंदर्भात ‘लोकमत’ ने वृत्त प्रकाशित करताच आरटीईच्या कायद्यान्वये भौतिक सुविधा देणे आवश्यक असल्याने बहुसंख्य शाळांनी छताचे पंखे बसविण्यास सुरुवात केली. संस्थाचालकांनीही पुढाकार घेऊन वर्गावर्गात पंखे आणले पण आता भारनियमन वाढल्याने पंखे असूनही उपयोग होत नाही. असे चित्र समोर आहे. पावसाअभावी चिंतेचे वातावरण आहे.
जि. प. शाळांना परवानगी द्यावी
वाढलेल्या तापमानामुळे चांगलाच उकाडा होत आहे. खेड्यापाड्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्राथमिक शाळांमध्ये गावातूनच पाणीपुरवठा होतो. पण बहुसंख्य गावांत पाणीटंचाई झाल्याने मुलांना पाणी वेळेवर मिळत नाही. पाऊस नाही, वाढते तापमान यामुळे विद्यार्थी वर्गात बसणे अवघड झाले आहे.परिणामी जि. प. शाळांनीही ‘हाफ डे’ करावे. व्यंकटेश भोगाजे
(बिलोली तालुकाध्यक्ष, अ. भा. प्रा. शिक्षक संघ).
तापमानात वाढ झाली आहे. पावसाळा उन्हाळ्याप्रमाणे जाणवत आहे हे वास्तव आहे. संस्थाचालक व शालेय समिती आपल्यास्तरावर हिताचा निर्णय घेऊ शकतात. परिस्थितीनुसार ‘हाफ डे’ करता येईल पण जि. प. चे निर्णय जिल्हा पातळीवरुन ठरतात.
माधव सलगर
गटशिक्षणाधिकारी, बिलोली