बिलोलीत अन्न सुरक्षा योजना गोत्यात
By Admin | Updated: June 20, 2014 00:10 IST2014-06-20T00:10:51+5:302014-06-20T00:10:51+5:30
बिलोली : तालुक्यात अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सवलतीचे धान्य वेळेवर येत नसल्याने बोंब उठली आहे़

बिलोलीत अन्न सुरक्षा योजना गोत्यात
बिलोली : तालुक्यात अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सवलतीचे धान्य वेळेवर येत नसल्याने बोंब उठली आहे़ शासकीय गोदामात पुरवठा होणाऱ्या ट्रान्सपोर्ट ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे लाभार्थ्यांना वंचित रहावे लागत आहे़
तालुक्यात शासकीय नोंदीनुसार ९३ हजार २०३ लाभार्थींना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ होतो़ प्रत्यक्षात पुरवठा विभागाच्या सर्व्हेक्षणानुसार ९८ हजार ९६६ लाभार्थी आहेत़
जिल्हा व तालुका प्रशासनात ताळमेळ जमला नसल्याने मागच्या सहा महिन्यापासून ५ हजार ३६३ लाभार्थीचा कोटा कमी येत आहे़ अशा परिस्थितीत लाभार्थींना माल कमी देण्यात येत आहे़ निवडणूक पूर्व फेब्रुवारी महिन्यात अन्न सुरक्षा योजना अंमलात आली़ प्रत्येक व्यक्तीला ३ किलो गहू व २ किलो तांदूळ देण्यात येते, पण साडेपाच हजार लाभार्थींचा आकडेवारीत घोळ झाला आहे़
आता मागच्या तीन महिन्यांपासून गोदामात २ हजार ७०५ क्विंटल तांदळापैकी केवळ बाराशे क्विंटल माल आला आणि १८९० क्विंटलपैकी केवळ ४१० क्विंटल गहू आला़ दरम्यान केशरी कार्डधारकांचा पुरवठा पूर्णत: बंद आहे़
पुरवठा वेळेवर होत नसल्याने लाभार्थी दुकान दाराकडे हेलपाटे मारत आहेत़ शासनाकडून दरमहा पुरवठा होताना बिलोलीत वेळेवर व कमी पुरवठा झाल्याने लाभार्थी वैतागले आहेत़(वार्ताहर)