महावितरणची अव्वा की सव्वा बिले

By Admin | Updated: August 10, 2014 02:00 IST2014-08-10T01:53:00+5:302014-08-10T02:00:51+5:30

महावितरणची अव्वा की सव्वा बिले

Bills of MSEDCL | महावितरणची अव्वा की सव्वा बिले

महावितरणची अव्वा की सव्वा बिले

जालना : शहरात बहुतांश भागातील वीज ग्राहकांना महावितरणकडून अव्वा की सव्वा बिले देण्यात येत असल्याने ग्राहकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या वाढीव रक्कमेच्या बिलांबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर त्यांच्याकडूनही कानाडोळा केला जात असल्याने दाद मागावी कुणाकडे, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.
वाढीव रक्कमेची बिले आल्याच्या अनेक तक्रारी दररोज महावितरणच्या कार्यालयात येत आहेत. मात्र संबंधित अधिकारी बेफिकिरपणे उत्तरे देत असल्याने ग्राहकांमध्ये नाराजी पसरत आहे. प्रत्येक घरगुती ग्राहकाने आपले मीटर घरासमोर लावणे आवश्यक आहे. परंतु घरासमोर मीटर असतानाही ज्या एजन्सीला मीटर रिडींग नोंद घेण्याचे काम दिले, त्यांच्याकडून ते घेतले जात नसल्याचे प्रकार समोर येत आहेत.
जुना जालन्यातील गणपती गल्ली भागात बाबासाहेब सुपारकर यांच्याकडे किरायाने असलेल्या तीन ग्राहकांना संयुक्तपणे आॅगस्ट २०१३ ते जून २०१४ या कालावधीत १०० युनिट दराचे बिल आहे. मात्र जुलै २०१४ मध्ये अचानक ३४ हजार २३० रुपयांचे बिल आले. याच भागातील विलास राखे यांनाही सुमारे वर्षभर अंदाजे युनिटचे बिल येत गेले. नंतर एकाचवेळी वाढीव बिल आले.
औरंगाबाद रोडवरील हॉटेल व्यावसायिक मोहन इंगळे यांना ८ महिन्यांच्या युनिटचे बिल एकाचवेळी मिळाले. घायाळनगर भागातील शिवाजीराव जावळे यांना एका मीटरवर २९०० रुपये बिल दरमहा येत होते. त्यांनी आणखी एक मीटर घेतले, तेव्हाही दोन्ही मीटरला प्रत्येकी तेवढेच बिल आले. टाऊनहॉल परिसरातील एकबाल कुरैशी यांचा वापर दरमहा ठराविक युनिटचाच आहे. मात्र अचानक त्यांना वापराच्या दुप्पट युनिटचे बिल आले.
नवीन मोंढा रोडवरील सिंधी कॉलनीतील विजय मोटवाणी यांना दरमहा १००० ते १५०० रुपये बिल येते. मात्र त्यांना अचानक ६००० रुपयांचे बिल आले.अंबडरोडवरील राजपुतवाडी भागातील दत्तात्रेय पाथरकर यांनाही दरमहा वीज वापराच्या दुप्पट बिल आहे. मात्र त्याकडे महावितरणचे दुर्लक्ष होते.
या ग्राहकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. तेव्हा ‘तुम्ही मीटरमधील युनिट पाहात नाहीत का, बिल आणि चालू युनिट यामधील अंतर समजत नाही का ’ असे प्रतिसवाल केले जातात. हे बिल तुम्हाला भरावेच लागेल असे सांगत फारतर हप्ते पाडून देऊ अशी सहानुभूती देण्याचा प्रयत्न करतात. वास्तविक सदरचे बिल वाढीव आहे, असे ग्राहक सांगत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. वीज बिलावर रिडिंगच्या कॉलममध्ये ‘आरएनए’ असे लिहून आल्यास तेथील रिडिंग संबंधित एजन्सीच्या कर्मचाऱ्यास उपलब्ध झाले नाही, असा दावाही महावितरणचे अधिकारी करतात. (प्रतिनिधी)

Web Title: Bills of MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.