कामाच्या पाहणीनंतरच बिल
By Admin | Updated: December 16, 2015 00:17 IST2015-12-16T00:01:48+5:302015-12-16T00:17:26+5:30
सुनील कच्छवे, औरंगाबाद मनपा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी ठेकेदारांची तब्बल ४३ कोटी रुपयांची बिले थांबविली आहेत.

कामाच्या पाहणीनंतरच बिल
सुनील कच्छवे, औरंगाबाद
मनपा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी ठेकेदारांची तब्बल ४३ कोटी रुपयांची बिले थांबविली आहेत. ठेकेदाराचे बिल काढण्यापूर्वी त्याने केलेल्या कामाची मला प्रत्यक्ष पाहणी करू द्या, त्यानंतरच त्याचे बिल काढण्याबाबत निर्णय घेऊ, असा स्पष्ट आदेशच त्यांनी लेखा विभागाला दिला आहे. त्यामुळे आता बोगसगिरी करणाऱ्या बहुसंख्य ठेकेदारांची आणि त्यांना साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांची पंचाईत झाली आहे. लेखा विभागाकडे सध्या ३७१ मोठ्या कामांची बिले प्रलंबित आहेत.
महानगरपालिकेत दरवर्षी विकासकामांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो; परंतु यातील अनेक कामे ही केवळ कागदावरच होतात. मनपाचे अधिकारी, ठेकेदार, नगरसेवक यांच्या अभद्र युतीतून हा प्रकार घडतो. पालिकेतील ही खाबूगिरी लक्षात घेऊन मनपाचे प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आता फेरतपासणीचा निर्णय घेतला आहे. केंद्रेकर यांनी लेखा विभागाला आदेश देऊन त्यांच्या मंजुरीशिवाय एकही बिल काढले जाऊ नये, असे स्पष्ट केले आहे.
कोणत्याही कामाचे बिल दाखल झाल्यानंतर त्याची पाहणी करू द्या, ते काम खरोखरच झाले आहे का, झाले असेल तर त्याचा दर्जा योग्य आहे का, या सर्व बाबींची पाहणी करून नंतरच ते बिल काढण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले आहे. या आदेशामुळे आतापर्यंत वरवरची कामे करून बिले उचलणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सद्य:स्थितीत लेखा विभागात एकूण ४३ कोटी रुपयांची बिले प्रलंबित आहेत. यात सर्वाधिक ३० कोटी रुपयांची बिले ही बी एन प्रकारातील म्हणजे दोन लाख रुपयांच्या वरील खर्चाची आहेत. त्यात प्रामुख्याने रस्ते, ड्रेनेजच्या कामांचा समावेश आहे. तसेच नगरसेवक, ठेकेदार आणि अधिकाऱ्यांसाठी कुरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेटलिस्ट आणि एन वन प्रकारातील कामांचीही तब्बल सात कोटी रुपयांची बिले सादर झालेली आहेत. याशिवाय विविध वस्तूंच्या पुरवठादारांचीही ३ ते ४ कोटी रुपयांची बिले लेखा विभागात दाखल झालेली आहेत. गेल्या काही वर्षांत रेटलिस्ट आणि एन प्रकारातील कामांवरच मोठा खर्च होतो; परंतु त्यातील असंख्य कामे ही कागदावरच राहत असल्याचे चित्र आहे. मात्र, आता पाहणीनंतरच कामाचे बिल काढण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतल्यामुळे त्याचे बिंग फुटणार आहे.
लेखा विभागातील अनागोंदी चव्हाट्यावर
पालिका आयुक्त केंद्रेकर यांनी लेखा विभागावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार आता ठेकेदारांच्या प्रलंबित बिलांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यात लेखा विभागाच्या अनागोंदी कारभाराचे बिंग फुटले आहे. लेखा विभागाने काही ठेकेदारांची बिले क्रम न पाळताच काढल्याचे समोर आले आहे. चार-सहा महिन्यांपूर्वीच काम केलेल्या काही ठेकेदारांची बिले अदा करण्यात आलेली आहेत, तर काही ठेकेदारांनी दोन-दोन तीन-तीन वर्षांपूर्वी कामे पूर्ण करूनही त्यांची बिले अद्याप अदा केलेली नसल्याचे या यादीवरून समोर आले आहे.