बळीराजा चेतना अभियान; निधीला फुटले पाय..!
By Admin | Updated: July 7, 2016 00:10 IST2016-07-07T00:06:58+5:302016-07-07T00:10:13+5:30
बालाजी आडसूळ , कळंब तालुक्यातील लोहटा पश्चीम येथील ग्रामपंचायतीचा कारभार मध्यंतरी आमरण उपोषणामुळे चव्हाट्यावर आला होता.

बळीराजा चेतना अभियान; निधीला फुटले पाय..!
बालाजी आडसूळ , कळंब
तालुक्यातील लोहटा पश्चीम येथील ग्रामपंचायतीचा कारभार मध्यंतरी आमरण उपोषणामुळे चव्हाट्यावर आला होता. सदरील घडामोड ताजी असतानाच आता बळीराजा चेतना अभियानाच्या निधीला पाय फुटल्याचे सांगत उपसरपंचांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन चौकशीसाठी अधिकाऱ्यांची तातडीने नियुक्ती करण्यात आली.
कळंब तालुक्यातील लोहटा पश्चीम ग्रामपंचायतीचा कारभार कुठल्या ना कुठल्या कारणावरून सतत चर्चेत असतो. सदस्यांना विश्वासात न घेणे, ग्रामसेवकांची गैरहजेरी अशा स्वरुपाच्या तक्रारी होत असत. मागील महिन्यात ग्रामपंचायत कार्यालयासमोरच शिवाजी जाधव व शाहूराव खोसे यांनी आमरण उपोषण केले होते. यावर प्रशासनाने चौकशी करुन कारवाई करु असे लेखी आश्वासन दिले होते. सदरील चौकशी होणे बाकी असतानाच आता दस्तूरखूद्द उपसरपंच रवीकांत पवार यांनी ग्रामपंचायतीच्या विविध खात्यावरील जमा रक्कमा व काही योजनेच्या अंमलबजावणीत आर्थिक गैरव्यवहार व अनियमतता झाल्याचे सांगत मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे धाव घेतली आहे. तक्रारीतील गांभीर्य लक्षात घेऊन पंचायत समितीकडून विस्तार अधिकारी पी. एस. माचवे व रोहयोचे पालक तांत्रिक अधिकारी उस्मानी यांची चौकशीसाठी नेमणूक केली आहे. परंतु, तत्कालीन दोन्ही ग्रामसेवकापैकी एकजण रजेवर तर दुसरे अनधिक्रतरित्या गैरहजर असल्याने चौकशीमध्ये अडथळे येत आहे.
शेतकऱ्यांसाठीची मदतही गायब
दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर बळीराजा चेतना अभियान राबवण्यात येत आहे. या योजनेतून गावातील त्रस्त व्यक्तींना तातडीची आर्थीक मदत देणेशेतकऱ्यांचे मनोबल वाढेल असे पुरक कार्यक्रम राबवण्यासाठी ग्रामपंचायतीला लाखभर रुपये मिळाले होते. सदर रक्कम कळंब येथील एका राष्ट्रीयकृत बँकेतील ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा झाली होती. ही रक्कम दोन प्रयत्नामध्ये गावातील रहिवाशी व गावाला परिचित नसलेल्या एका व्यक्तिच्या नावावर उचलण्यात आली आहे. वस्तुत: ही रक्कम धनादेशाद्वारे शेतकऱ्यांना वाटप करणे गरजेचे आहे.
प्रत्येक ग्रामपंचायतला १४ व्या वित्त आयोगाचा भरीव निधी मिळत आहे. हा निधी ग्रापच्या खात्यावर थेट जमा होत आहे.परंतु, असे असले तरी तो खर्च करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनेचा अवलंब करणे बंधनकारक आहे. त्यानुसार गावात गाईडलाईनप्रमाणे कृती आराखडा तयार करुन त्यास मान्यता घेणे, त्यानुरूप काम करणे आवश्यक आहे.
४लोहटा पश्चीम ग्रामपंचायतीला आजवर १४ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून मिळालेल्या निधतील तीन लाखापेक्षा जास्त रक्कम उचलली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही रक्कम कशासाठी उचलली? यातून कोणते काम केले? कृती आराखड्याप्रमाणे खर्च झाला का? आदी बाबींचा ‘सस्पेन्स’ निर्मान झाला आहे.
४ग्रामपंचायतीने महाग्रारेहयो अंतर्गत विहिरीचा लाभ घेतलेल्या एका शेतकऱ्याला दिलेला १ लाख १२ हजाराचा धनादेशही खात्यावर पुरेशी रक्कम नसल्याने 'बाऊन्स'झाला असल्याचे समोर आले आहे.
लोहटा पश्चिम ग्रापसंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी पंचायत समितीने माझी नियूक्ती केली आहे. प्राथमीक चौकशी पूर्ण झाली असून १९ जुलैपासून विस्तृत चौकशी सुरू होईल. तत्कालीन ग्रामसेवकांकडून अभिलेखे ताब्यात मिळालेली नाहीत. यासंदर्भात संबधीतांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. प्राथमिक चौकशीत रक्कमा उचलल्याचे निदर्शनास येत असले तरी त्याचा विनियोग झाला की नाही, हे विस्तृत चौकशीअंतीच स्पष्ट होणार आहे, असे विस्तार अधिकारी पी. एस. माचवे यांनी सांगितले.
ग्रामपंचायतची ग्रामनिधीची रक्कम, चौदाव्या वित्त आयोगाचा प्राप्त निधी, महाग्रारोहयो अंतर्गत शेतकरी, रोजगार सेवक यांना देण्यात येणारी रक्कम, घरकुल बांधकाम, शौचालय, बळीराजा चेतना अभियान आदी योजनांच्या निधीत मोठ्या प्रमाणात अनियमतता, गैरव्यवहार झाला आहे. याची तातडीने चौकशी व्हावी.
-रविकांत पवार, उपसपंच.