कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:57 IST2017-12-02T00:57:10+5:302017-12-02T00:57:15+5:30
भरधाव कारने दुचाकीस्वारांना धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात शुक्रवारी रात्री मृत्यू झाला आहे़ या अपघातात दुचाकीस्वार दुसरा तरुण जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एक जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : भरधाव कारने दुचाकीस्वारांना धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात शुक्रवारी रात्री मृत्यू झाला आहे़ या अपघातात दुचाकीस्वार दुसरा तरुण जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास औरंगाबाद- नाशिक मार्गावरील पडेगाव येथील एका पेट्रोलपंपाजवळ घडला. यावेळी चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार रस्त्याशेजारील झोपडीत घुसली. सुदैवाने झोपडीतील सात जण बाजूला पळाल्याने त्यांना दुखापत झाली नाही.
शेख इम्रान शेख अली (३२, रा़ इंदिरानगर, बायजीपुरा) असे मयताचे नाव आहे. शेख खाजा शेख नबाब (२२) हा या अपघातात जखमी झाला. पोलिसांनी सांगितले की, इम्रान आणि खाजा हे आज सकाळी मोटारसायकलने ( क्र.एमएच २०- बीके ७३७२) खुलताबाद येथील उरुसाच्या कार्यक्रमासाठी जात असताना समोरून आलेल्या कारने (क्र . एमएच-१७ एझेड ०७०८) त्यांना जोराची धडक दिली़ या अपघातात दोघेही रस्त्यावर पडले आणि गंभीर जखमी झाले. अपघातानंतर चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने तो कारसह रस्त्याशेजारील झोपडीत घुसला आणि थांबला. या घटनेत कारचालकासह इम्रान आणि खाजा हे गंभीर जखमी झाले. छावणी पोलिसांनी सर्व जखमींना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना इम्रानचा रात्री ७ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला़ अपघातात दुचाकी पूर्णत: चक्काचूर झाली आहे़
झोपडीतील सहा जण बजावले
अपघातात कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपडीत घुसली़ त्यावेळी झोपडीत एक महिला स्वयंपाक करीत होती तर तिची मुले तेथे बसली होती. अपघाताच्या आवाजाने ते सर्व जण बाहेर आले आणि कार त्यांच्या दिशेने येत असल्याचे पाहून दूर पळाले. त्यामुळे सुदैवाने झोपडीतील कोणालाही दुखापत झाली नाही. या घटनेची नोंद छावणी पोलीस ठाण्यात करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांनी दिली.ं