अल्पवयीन मुलांच्या मदतीने दुचाकी चोरी करणारा अटकेत; ४ दुचाकी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:05 IST2021-04-30T04:05:02+5:302021-04-30T04:05:02+5:30
औरंगाबाद : अल्पवयीन मुलांच्या मदतीने दुचाकी चोरणारा अट्टल गुन्हेगार अजय भाऊसाहेब गात (२१, रा. इंदिरानगर, बायजीपुरा) याला जिन्सी पोलिसांनी ...

अल्पवयीन मुलांच्या मदतीने दुचाकी चोरी करणारा अटकेत; ४ दुचाकी जप्त
औरंगाबाद : अल्पवयीन मुलांच्या मदतीने दुचाकी चोरणारा अट्टल गुन्हेगार अजय भाऊसाहेब गात (२१, रा. इंदिरानगर, बायजीपुरा) याला जिन्सी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १ लाख ६० हजार रुपयांच्या चोरीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
जिन्सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विजय जाधव, कर्मचारी अयुब पठाण, संपत राठोड, बी. पी. डोंबाळे, संजय गावडे, नंदलाल चव्हाण आणि शेख बासित हे गस्तीवर असताना कुख्यात अजय गात याच्याकडे चोरीची दुचाकी असल्याची माहिती त्यांना मिळाली. इंदिरानगर बायजीपुरा भागात तो पोलिसांना दिसला. पोलिसांना पाहून तो पळून जाऊ लागला. मात्र, पाठलाग करून पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याजवळ असलेल्या दुचाकीविषयी चौकशी केली, तेव्हा त्याने २० एप्रिल रोजी रात्री व्यंकटेशनगर येथील गणपती रुग्णालयासमोरुन ही दुचाकी दोन अल्पवयीन मित्रांच्या मदतीने चोरल्याची कबुली दिली. जवाहरनगर, एमआयडीसी वाळूज आणि अन्य एका ठिकाणाहून तीन दुचाकी चोरल्याचेही त्याने सांगितले. या चोरलेल्या दुचाकी त्याने विविध ठिकाणच्या वाहनतळांवर उभ्या केल्या होत्या. पोलिसांनी १ लाख ६० हजारांच्या चार दुचाकी जप्त केल्या.
============
चौकट
दोन महिन्यांपूर्वी कार फोडून लॅपटॉप चोरला होता
अजय गात हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहे. एकावर प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हाही त्याच्यावर नोंद आहे. शिवाय दीड ते दोन महिन्यांपूर्वी अपेक्स रुग्णालय रोडवर अनेक वाहनांच्या काचा त्याने फोडल्या होत्या. एका कारमधून लॅपटॉपही चोरला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला अटक केली होती. दोन दिवस पोलीस कोठडीत राहिल्यावर न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. लॉकअपमधून बाहेर आल्यावर त्याने पुन्हा गुन्हे करण्यास सुरुवात केली.
===========
दुचाकी विकण्याच्या तयारीत होता
अजय हा चोरलेल्या दुचाकीची विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत होता. मात्र, लॉकडाऊनमुळे त्याला खरेदीदार मिळत नव्हते. दारूच्या व्यसनासाठी तो हे गुन्हे करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.