बिहारीलालनगरात घर फोडले
By Admin | Updated: December 28, 2015 00:15 IST2015-12-28T00:02:29+5:302015-12-28T00:15:34+5:30
जालना : शहरातील बिहारीलालनगर येथील प्रमोद चुन्नीलाल बाकलीवाल यांचे घरफोडून चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिणे असा ५९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

बिहारीलालनगरात घर फोडले
जालना : शहरातील बिहारीलालनगर येथील प्रमोद चुन्नीलाल बाकलीवाल यांचे घरफोडून चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिणे असा ५९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली.
बाकलीवाल यांचे नवीन मोंढ्यात घाऊक किराणा दुकान आहे. शनिवारी रात्री ९.३० वाजेच्या दुकान बंद करून घरी आले होते. बँक बंद असल्यामुळे दिवसभरातील व्यवहाराची रक्कम त्यांनी घरातच ठेवली होती. त्यांचा मुलगा पुणे येथे शिक्षणासाठी असल्याने तो १८ डिसेंबर रोजी घरी आला होता. त्याला पुण्याला सोडण्यासाठी बाकलीवाल पत्नी, मुलासह कारने रात्री पुण्याकडे रवाना झाले.
दरम्यान, मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी त्यांच्या घराचा कोंडा कापून कुलूप काढला. घरात प्रवेश करुन कपाटामधील रोख ४७ हजार ५०० व १२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिणे असा ऐवज लंपास केला. सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांचे शेजारी प्रवीण पहाडे यांना त्यांचे घर उघडे दिसल्याने व साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ या घटनेबाबतची माहिती बाकलीवाल यांना दिली.
तसेच सदर बाजार पोलिसांनाही कळविले. माहिती मिळताच सदर बाजार पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.एम. मेहेत्रे, डिबी पथकाचे नंदू खंदारे, कृष्णा तंगे आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच श्वान पथक व फिंगरप्रिंट एक्सपर्टना पाचारण करण्यात आले होते.
श्वानाने बिहारीलालनगरच्या मागे असलेल्या नाल्यापर्यंत माग काढला.
दरम्यान, रविवारी सायंकाळी साडेचार वाजता बाकलीवाल हे
जालन्यात आले. त्यांनी घरी जाऊन काय काय चोरीस गेले याची पाहणी करून रात्री सदर बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सपोनि मेहेत्रे हे करीत असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)