देगलुरात मोठा मोर्चा
By Admin | Updated: December 18, 2015 23:31 IST2015-12-18T23:23:00+5:302015-12-18T23:31:04+5:30
देगलूर : देगलुरातील अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये दैनंदिन भाजी विक्रेत्यांना रस्त्यावर भाजी विक्री करण्यास प्रतिबंध घातला आहे़

देगलुरात मोठा मोर्चा
देगलूर : देगलुरातील अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये दैनंदिन भाजी विक्रेत्यांना रस्त्यावर भाजी विक्री करण्यास प्रतिबंध घातला आहे़ तळगल्ली परिसरातील तात्पुरत्या भाजीमंडईमध्ये कोणत्याच सुविधा नसल्या कारणाने भाजी विक्रेत्यांची तसेच ग्राहकांचीही मोठी गैरसोय होत आहे़ नगर परिषद प्रशासनाने येथे तातडीने सुविधा पुरविण्याची मागणी करीत आपले व्यवसाय बंद ठेवून उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला व धरणे आंदोलन केले़
मागील २०-२५ वर्षांत देगलूर नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र भाजीमंडईचे कोणतेच नियोजन झाले नाही़ तळगल्ली परिसरातील उद्यानासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या भूखंडावर भाजीमंंडई करण्यात आली आहे़ मंडईमध्ये उघड्या नैसर्गिक नाल्या, तेथे शेजारीच असलेल्या नगरेश्वर मंगल कार्यालयाचे सोडण्यात आलेले पाणी यामुळे होणारी दुर्गंधी, डुकरांचा, जनावरांचा मोठा वावर या गैरसोयी असून वीज, पाणी, स्वच्छतागृह यासह शेड यांची कोणतीच सुविधा उपलब्ध केली गेली नाही़ काही विक्रेत्यांनी मोठ्या क्षेत्रफळाच्या जागा ताब्यात घेतल्याने जास्त संख्येने असलेलया भाजी विक्रेत्यांना मोठी अडचण होते़ नगरपरिषदेने सध्याच्या मंडईमध्ये जमिनीचे समतलीकरण त्यावर फरशी अथवा काँक्रीट शेड, प्रखर वीज दिवे, पाणी आणि सर्व विक्रेत्यांसाठी निश्चित जागेचे ओटे यांचे नियोजन केल्यास भाजीपाला विक्रेते व ग्राहकांसाठी सोयीस्कर ठरणार आहे़ मंडईमध्ये मोकाट जनावरांचा शिरकाव होवू नये यासाठी संरक्षक कुंपनाची आवश्यकता आहे़
पालिका प्रशासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी सर्व भाजीपाला विक्रेत्यांनी एक दिवस व्यवसाय बंद ठेवून उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि तेथे ठिय्या आंदोलन केले़ या मागणीच्या समर्थनासाठी काँग्रेस कार्यकर्ते शशिकांत टेकाळे, एमआयएमचे शफी मामू, सामाजिक कार्यकर्ते नजीरमियाँ तांबोळी यांच्यासह अनेकजण यामध्ये सहभागी झाले होते.
(वार्ताहर)