छत्रपती संभाजीनगर : शहर पाणीपुरवठ्याची मुख्य योजना पूर्ण रूपात येण्यापूर्वी २०० कोटींतून टाकण्यात आलेल्या ९०० मि.मी.च्या जलवाहिनीतून शहराला २६ एमएलडी वाढीव पाणीपुरवठा १ ऑगस्टपासून सुरळीत होईल, अशी अपेक्षा बुधवारी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आली.
९०० मि.मी. जलवाहिनीचे काम ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्यानंतर हे काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराकडून प्रयत्न सुरू आहेत. असे असले तरी ९०० मि.मी. योजनेच्या कामाशी निगडित उर्वरित तांत्रिक कामे ३१ जुलैनंतरही सुरू राहतील. अशी शक्यता आहे. जलवाहिनीतून पाणीपुरवठा १ ऑगस्टपासून सुरू करा, उर्वरित कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करा, असे आदेश आयुक्तांनी कंत्राटदारांना दिले.
दरम्यान, विभागीय आयुक्त पापळकर यांनी शहर पाणीपुरवठा योजनेच्या सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. पाणीपुरवठा योजनेचे काम मुदतीत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीला पोलिस आयुक्त प्रवीण पवार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता किरण पाटील, मनपाचे काझी, नगर प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त संजय केदार आदींची उपस्थिती होती.
कंत्राटदाराला डेडलाइनची आठवणजायकवाडी धरणातील उद्भव विहीर (जॅकवेल) पासून ते नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्र, अशुद्ध जलवाहिनी, शुद्ध जलवाहिनी, ५५ पाण्याच्या टाक्या, जलशुद्धीकरण केंद्र फारोळा, ॲप्रोच ब्रिजसह पाणीपुरवठा योजनेचे काम डेडलाइनमध्ये पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला आठवण करून दिली. त्यासाठी यंत्रसामग्री व मनुष्यबळ वाढविण्याचे आदेश दिले.- जितेंद्र पापळकर, विभागीय आयुक्त