छत्रपती संभाजीनगर : सोलापूर-धुळे महामार्ग क्र. २४१ वरील कन्नड येथील औट्रम घाटात रेल्वे, ‘एनएचएआय’च्या माध्यमातून चार बोगदे बांधण्यास दिल्लीत झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले. अर्धा-अर्धा खर्च वाटून घेऊन प्रकल्प पूर्ण करण्याच्या तत्त्वावर दोन्ही मंत्रालयांचे एकमत झाले.
दीड दशकापासून औट्रम घाटात बोगदा बांधण्याचा प्रकल्प अवास्तव खर्चामुळे रेंगाळला होता. आता केंद्रीय रेल्वे व दळणवळण मंत्रालयाच्या जॉइंट व्हेंचरशिपमध्ये हा प्रकल्प मार्गी लावण्याचे ठरले. यात ३५०० कोटी रेल्वे तर ३५०० एनएचएआय अशी तत्त्वत: मान्यता मंगळवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत मिळाली. दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीस रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, खा. डॉ. भागवत कराड, उद्योजक राम भोगले, विवेक देशपांडे यांच्यासह दोन्ही मंत्रालयांतील वरिष्ठांसह गतिशक्तीचे संचालक व अधिकारी उपस्थित होते.
१५ किमी लांबीचे चार बोगदेऔट्रम घाटामध्ये १५ किलोमीटर लांबीचे चार बोगदे बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्यातील एका बोगद्यातून रेल्वे आणि दुसऱ्या बोगद्यातून राष्ट्रीय राजमार्ग धुळे-सोलापूरची वाहतूक जाईल. दोन बोगदे हे सुरक्षितेसाठी राखीव असतील.
भविष्यात ४० हजार वाहने धावतीलसध्या घाटामध्ये बोगदा नसल्याने ११० किलोमीटर अंतराचा फेरा मारून २२ हजार वाहने जात आहेत. येथे होणारी औद्योगिक गुंतवणूक लक्षात घेता, किर्लोस्कर व इतर नामांकित कंपन्याच्या भविष्यातील उत्पादनामुळे या महामार्गावरून तब्बल चाळीस हजार वाहनांची वाहतूक होईल.- राम भोगले, उद्योजक
दळणवळणाचे मॅग्नेटबोगदा दक्षिण आणि उत्तर भारताला जोडण्यासाठी महत्त्वाचा राहील. मराठवाड्यातील औद्योगिक व दळणवळणासह देशाच्या दोन दिशांना जोडणारा हा मार्ग असेल. सोबतच छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव, पुढे सोलापूरपर्यंतचा रेल्वेमार्ग कनेक्ट होईल. दळणवळणाचे मॅग्नेट तयार करणारे हे दोन मार्ग जवळपास मंजूर आहेत. डीपीआरसाठी दोन्ही मंत्रालये अर्धा-अर्धा खर्च करतील. काही महिन्यांत निविदा प्रक्रियेस सुरुवात होईल.- डॉ. भागवत कराड, खासदार
चाळीसगाव रेल्वेचा मार्ग मोकळा१५ किलोमीटर लांबीचे तीन बोगदे बनविण्यासाठी रेल्वे आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून भागीदारी तत्त्वावर प्रकल्प असेल. बोगद्याचा डीपीआर बनविण्यासंदर्भात दोन्ही मंत्र्यांनी त्यांच्या यंत्रणांना आदेश दिले. यामुळे चाळीसगाव रेल्वेचा मार्गही मोकळा झाला आहे.