छत्रपती संभाजीनगर: जमिनीला वर्ग-एक मध्ये रूपांतर करण्यासाठी निवासी उप जिल्हाधिकारी विनोद खिरोळकर याच्यासाठी पाच लाखांची लाच स्वीकारताना महसूल सहाय्यक दिलीप त्रिभुवन यास लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील रोडवर आज दुपारी करण्यात आली.
प्राथमिक माहिती अशी की, याप्रकरणी तक्रारदार (वय 49, राहणार छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी व त्यांच्या पार्टनरने मौजे तिसगाव, गट क्रमांक 225/5 येथील 6 एकर 16 गुंठे वर्ग 2 जमीन सन 2023 मध्ये शासनाची परवानगी घेऊन सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून खरेदी केली होती. या जमिनीला वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी लागणारे शासकीय चलन तयार करून देण्यासाठी महसूल सहाय्यक दिलीप त्रिभुवन (वय 40) व निवासी उप जिल्हाधिकारी विनोद खिरोळकर (वय 51) यांनी तक्रारदारांकडून 18 लाख रुपयांची लाच मागितली होती. याआधी देखील त्यांनी 23 लाख रुपये घेतले असल्याचे समोर आले आहे.
तक्रारीनुसार, दिनांक 26 मे 2025 रोजी आरोपी आणि तक्रारदार यांच्यात झालेल्या चर्चेत प्रथम 5 लाख रुपये घेऊन उर्वरित 13 लाख रुपये फायनल फाईल पूर्ण झाल्यानंतर देण्याचे ठरले होते. त्यानंतर दिनांक 27 मे 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर समोरील रोडवर सापळा रचण्यात आला. आरोपी त्रिभुवन याने तक्रारदाराकडून 5 लाख रुपये लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात अटक केली. त्याचवेळी दुसऱ्या पथकाने विनोद खिरोळकर यास ताब्यात घेतले. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7, 7A, 12 अंतर्गत सिटी चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद अघाव, पो.उप.अधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण, सहायक अधिकारी गोरखनाथ गांगुर्डे, पोलीस उपाधीक्षक दिलीप साबळे, पोनि धस, केशव दिंडे, चेनसिंग घुशिंगे, पो.ह. राजेंद्र सिनकर यांनी केली. आणि अन्य कर्मचारी सहभागी होते