अतिक्रमण हटविण्यासाठी पालिकेचा मोठा फौजफाटा
By Admin | Updated: December 27, 2016 00:12 IST2016-12-27T00:10:35+5:302016-12-27T00:12:48+5:30
जालना : शहरातील १७ अनधिकृत धार्मिकस्थळांचे अतिक्रमण मंगळवारी सकाळी पोलिस बंदोबस्तात हटविण्यात येणार आहे.

अतिक्रमण हटविण्यासाठी पालिकेचा मोठा फौजफाटा
जालना : शहरातील १७ अनधिकृत धार्मिकस्थळांचे अतिक्रमण मंगळवारी सकाळी पोलिस बंदोबस्तात हटविण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने दीडशे कर्मचाऱ्यांसह दीडशे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा असणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात १७ धार्मिकस्थळे अनधिकृत आहेत. याचे सर्व्हेक्षण पालिकेने केले असून, संबंधितांना ते काढून घेण्यासाठी वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. अनेक धार्मिक स्थळांनी अतिक्रमण न काढल्याने मंगळवारी सकाळी हे अतिक्रमण काढण्यात येणार आहे. यासाठी नगर पालिकेने पूर्ण तयारी केली आहे. अतिक्रमण पथकांसह विविध पथकांची स्थापना करण्यात आल्याचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी सांगितले. अतिक्रमण हटविण्यासाठी नगर पालिकेचे स्वच्छता विभाग, बांधकाम विभाग तसेच अन्य विभागातील मिळून सुमारे दीडशे कर्मचारी मोहिमेत सहभागी होणार आहे. यासाठी ४ ट्रॅक्टर्स व दोन जेसीबी वापरण्यात येणार आहेत.
काही धार्मिक स्थळांच्या विश्वस्त स्वत:हून अतिक्रमण काढून घेणार असल्याचे खांडेकर यांनी सांगितले. लोकभावना लक्षात घेता संबंधितांना पालिकेस सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. नवीन व जुना जालन्यात मिळून धार्मिक स्थळांचे अतिक्रमण आहे. मंगळवारी सकाळी सात वाजता ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे. काही अनुचित घटना घडू नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी तसेच अन्य पोलिस निरीक्षकांचा बंदोबस्त या कारवाई दरम्यान असणार आहे. धार्मिकस्थळांच्या विश्वस्तांनी स्वत:हून अतिक्रमण काढल्यास मोठी मदत होईल, सोबतच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, असा विश्वास खांडेकर यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)